Saturday, 17 January 2009

धारगळ क्रीडानगरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भाजपचे निवेदन

पणजी,दि.१६(प्रतिनिधी) : धारगळ येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित क्रीडानगरी प्रकल्पाबाबत तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या समवेत क्रीडामंत्री मनोहर आजगावकर हे देखील हजर होते. धारगळ क्रीडा नगरी प्रकल्पासंदर्भात खासदार नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
दरम्यान, आज सादर करण्यात आलेल्या निवेदनात गोवा सरकारने धारगळ मतदारसंघातील क्रीडा नगरीसाठी सुमारे २१ लाख चौ.मी.शेत जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. या जमिनीत गेल्या १४ ते २० वर्षांपासून पाणी उपलब्ध नसतानासुद्धा दूरवरून हातांनी पाणी भरून फलोत्पादन योजने अंतर्गत सुमारे २५०० आंब्यांच्या कलमांची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड उध्वस्त न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने विकास करावयाची संकल्पना असेल तर गोवा सरकारने धारगळ मतदारसंघात क्रीडा नगरी प्रकल्प हाती घेण्यापूर्वी अशा तऱ्हेची जमीन वगळून त्यासाठी दाखविण्यात आलेल्या पर्यायी जागेचा या प्रकल्पासाठी जरूर विचार करावा, असा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आला.
दरम्यान मुख्यमंत्री कामत व क्रीडामंत्री आजगावकर यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यासंदर्भात सरकार निश्चितच विचार करून शेतकऱ्यांना न्याय देईल असा विश्र्वास खासदार श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता तसेच त्यांनी अथक प्रयत्न व परिश्रमाने तयार केलेल्या उपजीविकेच्या साधनांवर नांगर फिरवून त्यांच्या पोटावर लाथ मारू नये, अशी विनंतीही यावेळी शिष्टमंडळाने केली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा