पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - आल्तिनो पणजी येथे एका तरुण वैद्यकीय लष्करी अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आज सकाळी 9.30वाजता ही घटना उघडकीस आली. या अधिकाऱ्याचे नाव मानू यादव (27) असे असून तो मूळ हरयाणाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. या अधिकाऱ्याने खोलीत लिहून ठेवलेली चिठ्ठीही सापडल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, त्याबाबत कोणताही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. सदर अधिकारी मृत झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. उद्या सकाळपर्यंत त्याचे नातेवाइक गोव्यात दाखल होतील. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याविषयीचा तपास उपनिरीक्षक बबन पवार करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा