डिचोली, दि. २६ (प्रतिनिधी): वाठादेव - डिचोली येथे एका इसमाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्याची घटना आज घडली. त्यामुळे डिचोली परिसरात एकच खळबळ माजली असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबी विठो मोटे (५२) या इसमाचा अज्ञातांनी खून केला आहे. त्याच्या अंगावर व मानेवर तीन ठिकाणी जखमा होत्या. अंगात फाटलेला बनियन तर कंबरेखाली कसलेच वस्त्र नव्हते. घटनास्थळी पोलिसांना धारदार शस्त्र आढळून आले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत.
बाबी मोटे हा गेली अनेक वर्षे वाठादेव (धाट) येथील बेग यांच्या घरात ‘केअर टेकर’ म्हणून राहत होता. तो एकटाच या घरात राहायचा व मोलमजुरी करायचा. आज दुपारी घराचे मालक बेग यांनी बाबीला बोलाविण्यासाठी दोन इसमांना पाठविले होते. त्यानुसार ते ‘त्या’ घरात गेले असता बाबी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण केले. श्वानपथक अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पुन्हा माघारी परतले. घटनास्थळी सांडलेल्या रक्तावर अज्ञाताच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. पोलिसांना घटनास्थळी ‘कोयती’ सादृश्य हत्यार सापडले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत. त्यामुळे प्रकरणाला वेगळी गती मिळाली आहे. सदर इसम विवाहित आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो एकटाच राहत होता. बायकोला त्याने सोडले होते. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काल रात्री ८.३० नंतर ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा