डिचोली, दि. ३० (प्रतिनिधी): विरूपाक्ष ऊर्फ स्वामी महारुद्रय्या (२९, रा. रामदुर्ग - बेळगाव) या इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावकरवाडा - डिचोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतला असून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. उद्या. दि. ३१ रोजी मृतदेहाची शवचिकित्सा झाल्यानंतरच सदर इसमाच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरूपाक्ष ऊर्फ स्वामी महारुद्रय्या हा मूळ रामदुर्ग - बेळगाव येथील इसम गावकरवाडा - डिचोली येथील संतोष मांद्रेकर यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता. काल रात्री त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने व खोली कुलूपबंद असल्याने संतोष मांद्रेकर यांनी याप्रकरणी डिचोली पोलिसांना कळवले. पोलिसांनी सदर खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना कॉटच्या खाली चादरीत गुंडाळलेला स्वामी याचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकार हा खुनाचा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवून त्या दिशेने तपासकामास सुरुवात केली आहे. मयत स्वामी याचे कुटुंबीय गोव्यात दाखल झाले असून उद्या शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इसम गवंडी म्हणून काम करत होता. त्याला बायको व दोन मुले असून दहा महिन्यांपूर्वीच त्याने त्यांना गावी पाठवले होते. डिचोली पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा