Tuesday, 5 January 2010

सडा येथील कचरा प्रकल्पाबाबत पालिका-एमपीटी आमनेसामने

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी)- मुरगाव नगरपालिकेच्या सडा येथे असलेल्या कचरा प्रकल्पामुळे तेथील एमपीटी इस्पितळ तसेच रहिवासी वसाहतीला प्रदूषणाची झळ पोचत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करून सुमारे ७०० जणांनी आज या प्रकल्पाच्या समोर निषेध मिरवणूक काढली. तर, मुरगावच्या ९७ टक्के लोकांना या कचरा प्रकल्पाची आवश्यकता असून या प्रकल्पाची सर्व कागदपत्रे असल्याची माहिती मुरगावचे नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी दिली. एमपीटी विनाकारण जनतेला सतावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आज सकाळी "गोवा पोर्ट अँड डॉक एम्प्लॉईज युनियन'चे कामगार, एमपीटी इस्पितळाचे कामगार तसेच इतर मिळून सुमारे ७०० लोकांनी सडा येथे असलेल्या कचरा प्रकल्पाजवळ फेरी काढून हा प्रकल्प येथून हटवण्याची जोरदार मागणी केली. यावेळी येथे पाहणी करण्यासाठी आलेल्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांनी याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितल्याची माहिती युनियनच अध्यक्ष लॉरेन्स कार्दोज यांनी दिली. या कचरा प्रकल्पामुळे येथे असलेल्या इस्पितळाला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. इस्पितळाबरोबर येथील वसाहतीतल्या लोकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व प्रदूषणाचा त्रास सोसावा लागत आहे. हा कचरा प्रकल्प येथून हटवण्याबाबत सुमारे एक हजार एकशे दहा लोकांच्या सह्या घेण्यात आल्याची माहिती कार्दोज यांनी दिली. हा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा प्रकल्पासाठी मेटा स्ट्रीप येथे जागा सुचविल्याचे सांगून त्यासाठी एमपीटी खर्च करण्यास तयार असल्याचे त्यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
दरम्यान सदर प्रकाराबाबत संध्याकाळी मुरगावचे नगराध्यक्ष श्री. खडपकर यांनी पत्रकार परिषद बोलावून एमपीटी येथील जनतेला कारणाशिवाय सतवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. पालिका या प्रकाराचा निषेध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष कालुर्स आल्मेदा, सैफुल्ला खान, मनीष आरोलकर, नगरसेवक काशिनाथ यादव, आरनॉर्ल्ड रेगो, सेबी डिसोझा, लविना डिसोझा, कृष्णा (दाजी) साळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कचरा प्रकल्पाची सर्व कागदपत्रे असल्याचे स्पष्ट करताना नगराध्यक्षांनी एमपीटीनेच एकप्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती दिली. कचरा प्रकल्पापासून सुमारे ५०० मीटर परिघात कोणत्याच प्रकारचे बांधकाम करू नये असा नियम असून याचे उल्लंघन केल्याची माहिती दिली. सदर इस्पितळ दहा मीटराच्या परिघात बांधण्यात आल्याचे सांगितले.
मुरगाव नगरपालिकेचा सडा येथे असलेला कचरा प्रकल्प हटवणे अशक्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
सडा येथे असलेल्या कचरा प्रकल्पामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी पालिका सर्वतोपरी उपाय योजत आहे. कचरा प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणाऱ्या एमपीटीने त्यांच्यामुळे रात्रीच्या वेळी होत असलेल्या प्रदूषणाचा विचार करावा, असे आवाहन नगराध्यक्ष खडपकर यांनी गोवादूतशी बोलताना केले.

1 comment:

आपली प्रतिक्रिया नोंदवा