Tuesday, 5 January 2010

कल्वर्टप्रकरणी आज निवाडा


युक्तिवाद पूर्ण

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी): कोलवा सीडी प्रकरणातील संशयित आरोपी कल्वर्ट गोन्साल्वीस व अन्य दोघांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. उद्या मंगळवार दि. ५ रोजी सकाळी १० वा. त्यावर निवाडा दिला जाणार आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद कामत यांच्यासमोर आज हा युक्तिवाद झाला. कल्वर्ट गोन्साल्वीस याच्या वतीने ऍड. राधाराव ग्राशियस तर पोलिसांतर्फे सरकारी वकील ऍड. सरोजिनी सार्दिन यांनी युक्तिवाद केला. कल्वर्ट गोन्साल्वीस याचे वकील राधाराव ग्राशियस यांनी भावना दुखावण्यासारखी कोणतीच आक्षेपार्ह गीते व संवाद सीडीत नसल्याचे सांगताना त्यामुळे धार्मिक भावना कशा दुखावणार, असा सवाल केला. गोव्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. येशू ख्रिस्तावर असाच चित्रपट आला होता. पण त्यावेळी भावना दुखावल्याचा कंठशोष कोणीच केला नव्हता, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. काही लोक गावात धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा व न्यायालयाबाहेर जमून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. न्यायाधीशांनी त्याची योग्य ती दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली. सदर सीडीमध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याने आपल्या अशिलाला जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. कलम १५३ "अ' नुसार दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावण्यासारखा हा प्रयत्न नाही, असा दावाही त्यांनी केला.
सरोजिनी सार्दिन यांनी आपल्या युक्तिवादात फादर डाएगो फर्नांडिस हे धर्मगुरू आहेत व नाताळच्या दिवसात ही सीडी प्रसिद्ध करून त्यांची हेतुपुरस्सर बदनामी करण्यात आल्याचे सांगितले. हा अत्यंत आक्षेपार्ह प्रयत्न असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. हा प्रकार हेतुपुरस्सर केलेला असल्याने व पोलिसांना चौकशीसाठी कल्वर्ट हवा असल्याने त्याला जामीन देणे योग्य होणार नाही. सीडीच्या मुखपृष्ठात धर्मग्रंथ बायबलाचे चित्र दाखवूनही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
परवाप्रमाणे आज सकाळीही न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. पोलिस अधीक्षक ऍलन डिसा हे स्वत: पोलिस फौजफाट्यासह तेथे उपस्थित होते. परंतु, कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. उद्या सकाळी या प्रकरणाचा निवाडा होणार असल्याने त्यावेळीही लोक जमण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्या संध्याकाळी ४.३० वा. जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी कोलवा घटनेसंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संयुक्त बैठक बोलावली असून पोलिस व चर्चच्या प्रतिनिधींना बैठकीला पाचारण करण्यात आले आहे.

1 comment:

आपली प्रतिक्रिया नोंदवा