लॉसएंजील्स, दि. १५ : 'डर्टी डान्सिंग' आणि "घोस्ट' यासारख्या थरारपटांद्वारे रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या हॉलिवूडपटांचा नायक पॅट्रिक स्वेझ याचे आज येथे जठराच्या कॅन्सरने निधन झाले. तो ५७ वर्षांचा होता.
गेल्या वीस महिन्यांपासून त्याची या असाध्य दुखण्याशी झुंज सुरू होती; पण त्याने या वेदना चेहऱ्यावर एकदाही प्रकट केल्या नाहीत. मृत्यूशी त्याचा संघर्ष सुरू असल्याचे त्याच्या चाहत्यांना उमजले होते. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याच्या चाहत्यांनी विधात्याला साकडे घातलेले असतानाच पॅट्रिक ख्रिस्तवासी झाला. पॅट्रिकच्या प्रसिद्धी संचालकांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. त्याखेरीज त्याच्याबद्दल आणखी कोणताही तपशील देण्यात आला नाही. डर्टी डान्सिंग हा त्याचा चित्रपट तिकीटबारीवर अफाट यशस्वी ठरला. या चित्रपटाने रसिकांना अक्षरशः थिरकायला लावले. आता त्या पावलातील चैतन्य कायमचे हरपल्याने रसिकांचे डोळे पाण्याने डबडबले आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा