Monday, 3 August 2009

जामीन फेटाळला जाताच तिन्ही सशयित फरारी

"तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन व्हा'
बाल न्यायालयाने आरोपींना बजावले


पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- "त्या' दुर्दैवी अल्पवयीन मुलीवर निर्दयी अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित औदुंबर पेडणेकर याला मंजूर झालेला जामीन आज अखेर बाल न्यायालयाने रद्दबातल ठरवला. या प्रकरणातील आणखी दोघी संशयित असलेल्या पेडणेकर याची पत्नी मीनाक्षी पेडणेकर व त्याची मेव्हणी रेखा ऊर्फ टिना वाघेला यांचा अटकपूर्व जामीनही बाल न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, हे तीनही संशयित फरारी असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे,अशी माहिती म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुंडू नाईक यांनी दिली.
पर्वरी येथे घरात मोलकरीण म्हणून काम करीत असलेल्या सदर अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा गंभीर विषय आहे व त्याची सखोल चौकशी व्हावी व यासाठी संशयित आरोपी औदुंबर याने तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, असेही बाल न्यायालयाने आपल्या आदेशात बजावले आहे. काल यासंबंधीची सुनावणी सुरू असताना बाल न्यायालयात उपस्थित असलेली औदुंबर याची पत्नी मीनाक्षी ही देखील गायब झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाप्रमाणे या तिघाही संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता कमी असूनदेखील या तिघांवरही नजर ठेवण्यात पोलिस अपयशी ठरले. त्यामुळेच या तिघांना फरारी होण्यास संधी मिळाली,असा उघड आरोप होतो आहे.
दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून मिळालेल्या पहिल्या आरोग्य चाचणी अहवालात सदर मुलीच्या अंगावरील जखमा किरकोळ असल्याचे म्हटले होते परंतु वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दुसऱ्या अहवालात या सदर मुलीच्या अंगावर २३ गंभीर जखमा असल्याचे म्हटले होते. हा नवीन अहवाल बाल न्यायालयाने आज ग्राह्य धरला. सदर मुलीवर झालेला अत्याचार हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे,असेही या निकालात म्हटले आहे. सदर मुलीजवळ ती अनुसूचित असल्याचा दाखला उपलब्ध नाही. ती गोव्यात स्थलांतरित झाल्याने दुसऱ्या राज्यातील दाखलाही ती सादर करू शकत नाही, असा युक्तिवाद संशयित आरोपीच्या वतीने बोलताना ऍड.धोंड यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी प्राथमिक स्तरावर सुरू असल्याने या गोष्टी सध्या विचारात घेण्याची आवश्यकता नाही,असे बाल न्यायालयाने म्हटले आहे. त्या मुलीला चार हजार रुपये स्वीकारून कोणीतरी पेडणेकर कुटुंबीयांकडे कामाला ठेवले होते, ही गोष्ट न्यायालयाच्या नजरेला आणून देत हे प्रकरण केवळ बाल अन्यायाचे नसून त्यात एट्रोसिटीचाही भाग येतो,असा युक्तिवाद सरकारी वकील ऍड. पूनम भरणे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी म्हापशाचे उपविभागीय अधिकारी गुंडु नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा