मुंबईच्या तरुणीला सापळा रचून अटक
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोव्यातील एका इंग्रजी दैनिकात "आयुर्वेदिक मसाज' करण्याची जाहिरात देऊन वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी एका तरुणीला पणजी पोलिसांनी काल मध्यरात्री पणजी कदंब बसस्थानकाच्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. अटक केलेल्या तरुणीचे नाव कविता पांडिलकर (२९) असे असून ती मूळ मीरा रोड, ठाणे मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.
फेब्रुवारी २००९ पासून मेरशी येथे एका भाड्याच्या खोलीत राहून ती हा व्यवसाय करीत होती. गेल्या एका महिन्यापासून पोलिस तिच्या मागावर होते. प्राप्त माहितीनुसार इंग्रजी दैनिकातील छोट्या जाहिराती येणाऱ्या पानावर आयुर्वेदिक मसाज करण्याची जाहिरात देऊन तिने आपला व्यवसाय जोमाने चालवला होता. दिवसाला शंभर रुपये भरून ही जाहिरात दिली जायची. त्या जाहिरातीच्या खाली "श्रेया' असे नाव देऊन मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. ही बाब काही पत्रकारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा सापळा रचला. गेल्या काही दिवसापासून ते या तरुणीच्या संपर्कात होते. गेल्या पंधरा दिवसापासून ती पोलिसांना झुलवत होती. मात्र काल मध्यरात्री ती पणजी कदंब बसस्थानकावर आली असता तिला महिला पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा