Wednesday, 14 January 2009

गोव्यात लवकरच स्थापन होणार 'सीआयएसएफ'चा खास विभाग

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याने आणि प्रत्येक उत्सवाला तसेच दर वर्षी नव्या वर्षाला कडक सुरक्षा ठेवण्यासाठी निमलष्करी दलाची मदत घ्यावी लागत असल्याने गोव्यात कायम स्वरूपी "सीआयएसएफ' या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा खास विभाग गोव्यात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तशा स्वरूपाचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने गोवा सरकारला पाठवला असून याठिकाणी "सीआयएसएफ'चे सातशे जवान असलेली संपूर्ण एक बटालियन गोव्यात कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे या खास विभागाच्या उभारणीसाठी लागणारी शंभर अॆकर जागा गोवा सरकार उपलब्ध करून देणार आहे. ही माहिती स्पेशल सेलचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज दिली.
ही जागा पाहण्यास सुरुवात झाली असून मेटास्ट्रीप परिसर वेर्णा व दुर्भाटपठार फोंडा येथे जागा पाहण्यात आली आहे. यातील कोणत्याही एका ठिकाणी जागा निश्चित करून हा खास विभाग उभारला जाणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाचा खर्च व या जवानांना देण्यात येणारे वेतनाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, नववर्षाच्या काळात गोव्यात सुरक्षा पुरवण्यासाठी मागवण्यात आलेल्या सहा कंपन्या अद्याप गोव्यात असून त्यांच्यावर येत्या २३ जानेवारी नंतर विचार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्भाट फोंडा हा परिसर गोव्याच्या केंद्रस्थानी असल्याने या जागेला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. एका बटालियनमधे दहा कंपन्या असतात आणि एका कंपनीत शंभरच्या आसपास जवान असतात. गोव्याच्या कोणत्याही भागात अधिक जवानांची गजर भासल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास या जवानांना तैनात केले जाणार आहे. कडक सुरक्षा पुरवण्यास आणि मोठ्या जमावाला काबूत आणण्याचे खास प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. त्यामुळे कोणत्याही हल्ल्याला किंवा तणावाला सामोरे जाण्यासाठी पोलिस खात्याची पुरेपूर क्षमता असणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
"सीआयएसएफ'बरोबरच गोवा सरकारची "आयआरबी'चेही मुख्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. आयआरबीच्या दोन बटालियन असून अजून एका बटालियनची येत्या काही दिवसात भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या गोव्यातील विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट व गोवा शिपयार्ड यांच्या सुरक्षेची जबाबदारी "सीआयएसएफ'कडे असून त्यांच्या काही कंपन्या गोव्यात आहेत. त्यामुळे "सीआयएसएफ'च्या महासंचालकांशी सुरुवातीची बोलणी झाली असून त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दोन ठिकाणी पाहण्यात आलेली जागा निश्चित करण्यापूर्वी "सीआयएसएफ'चे वरिष्ठ अधिकारी जागेची पाहणी करण्यासाठी गोव्यात येणार आहेत. या खास विभागात प्रशिक्षण केंद्र तसेच त्या जवानांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा