Tuesday, 13 January 2009

जखमीवर उपचारास विलंबामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी वाहतूक रोखली


फोंडा, दि.१२ (प्रतिनिधी) - येथील कदंब बसस्थानकाजवळील परशुराम फर्मागुडी येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका खासगी मिनिबसने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या परेश नागराज बेल्लूर (१९ वर्षे, रा. पंडितवाडा फोंडा) या फर्मागुडी येथील गोविंद रायतूरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यास वेळकाढूपणा करण्यात आल्याने संतप्त बनलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवून वाहतूक ठप्प केली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जखमी परेश याला आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा येथील परेश बेल्लूर हा आपल्या एका मित्रासमवेत फर्मागुडी येथील रायतूरकर महाविद्यालयात चालत जात असताना परशुरामनगर येथे फोंड्याहून फर्मागुडीच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी मिनिबसने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. मिनी बसची धडक बसल्याने तो रस्त्याच्या बाजूला कोसळला. त्याला तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, डोक्याला जखम झाल्याने बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांत खळबळ माजली. गेल्या काही महिन्यापूर्वी फर्मागुडी येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील एका मुलीचा विद्यालयात जात असताना मिनी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. जखमी परेश याला घेऊन काही विद्यार्थी बांबोळी येथे गेले असता तेथे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात वेळकाढूपणा करण्यात आला. ही माहिती फर्मागुडी येथे विद्यार्थ्यांना समजल्यानंतर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले. येथील पोलिस स्टेशनवर मोर्चा आणून पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांची भेट घेऊन या अपघाताची गंभीर दखल घेऊन तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर ही माहिती बांबोळी येथील इस्पितळातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. येथील पोलिस स्टेशनवरून विद्यार्थी थेट फर्मागुडी येथील महाविद्यालयाजवळील रस्त्यावर एकत्र झाले. फर्मागुडी येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. जखमी परेश याला आरोग्य सेवा उपलब्ध केल्याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी माघार घेतली.
या प्रकरणी फोंडा पोलिसांनी मिनी बसचा (जीए ०४ टी ११३९) चालक किशोर बोरकर याच्या विरोधात वाहन निष्काळजीपणे चालविल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. जखमी परेश याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा