वास्कोतील घटना; गोमेकॉत दाखल
वास्को, दि.९ (प्रतिनिधी): आज (मंगळवारी) ईदच्या दिवशी आपल्या बहिणीबरोबर इमारतीतील गच्चीत खेळत असताना तोल जाऊन शहदमा (३) व कुस्नुमा (५) या दोघीही खाली कोसळल्या. वास्को येथील प्रवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मौलाना इब्राहिम यांच्या या दोन्ही कन्या असून त्यांना गंभीर अवस्थेत बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
ही घटना दुपारी ४.३० वा. घडली. शहदमा व कुस्नुमा या दोघी बहिणी गच्चीत असलेल्या खुर्चीवर उभ्या राहून खेळत होत्या. त्यावेळी त्यांचा तोल गेला. बाल्कनीला कठडा नसल्याने त्या दोघीही रस्त्यावर पडल्या. लोकांनी त्यांना पाहताच त्वरित चिखलीच्या कुटीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना तेथून बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहदमाची प्रकृती गंभीर असून कुस्नुमा थोडीफार ठीक आहे. यावेळी निरीक्षक हरीष मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर इमारत जुनी असून त्याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा