पेशावर, दि. ५ : पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांतातील कलाया येथे आज शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात किमान दहा ठार, तर सुमारे शंभरहून अधिक जण जखमी झाले. इद उल अझा या सणासाठी लोक खरेदीत मग्न असतानाच हे धमाके झाले. त्यामुळे कित्येक इमारतींना आग लागली. त्यात होरपळून अनेक जण जखमी झाले. त्यापैकी कित्येकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. कानठळ्या बसवणाऱ्या या स्फोटांमुळे अनेक शक्तिशाली इमारतींचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांना या स्फोटांमुळे जोरदार धक्का बसला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा