Saturday, 20 November 2010

शिरगाव वाचवण्याचा नागरिकांचा निर्धार

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- शिरगाव गावावर खाण उद्योगाने चालवलेल्या अतिक्रमणाविरोधात "शिरगाव बचाव अभियान' या नावाखाली व्यापक जनजागृती लढा उभारण्याचा निर्धार स्थानिकांनी केला आहे. या गावावर ओढवलेल्या संकटाची माहिती गावच्या व गावाबाहेरील नागरिकांपर्यंत पोचवून हा गाव वाचवण्यासाठी एक मोठी ताकद उभारण्याचा संकल्पच शिरगाववासीयांनी सोडला आहे.
शिरगावातील स्थानिकांनी विरोध करूनही खाण खात्यातर्फे "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनी'ला खाण खात्यातर्फे "लीझ' परवाना देण्याचा प्रकार घडल्याने गावात वातावरण बरेच तापले आहे. चौगुले व बांदेकर यांना दिलेला खाण परवाना हा शिरगावची सुपारी देण्याएवढाच गंभीर गुन्हा आहे, असा आरोप दिलीप भास्कर गावकर यांनी केला. या नियोजित "लीझ'च्या जागेत महत्त्वाची धार्मिक ठिकाणे व अनेकांची घरे वसली आहेत. या नव्या "लीझ' कराराद्वारे स्थानिकांच्या भावनांशी सरकारने खेळ आरंभल्याने ही कृती महागात पडेल, असा इशाराही श्री. गावकर यांनी दिला.
एवढी वर्षे स्थानिकांनी आपल्यापरिने या खाण उद्योगाचा सामना करण्याचे प्रयत्न केले. परंतु पैसा व बळाच्या मदतीने स्थानिकांचा विरोध चिरडून टाकण्यात खाण कंपन्या यशस्वी ठरल्या. घरचेच भेदी निर्माण करून गावात फूट पाडण्याचे षड्यंत्रही त्यांनी केले. शिरगाववासीयांना आपले गुलाम बनवून या भूमीवर आपला कब्जा करण्याचा खाण उद्योजकांचा डाव कदापि सफल होऊ देणार नाही व त्यासाठी शिरगावातील तमाम लोकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन दिलीप गावकर यांनी यावेळी केले. गावातील युवकांनी या लढ्यासाठी पुढे यावे,असेही ते म्हणाले.
शिरगावच्या रक्षणासाठी तमाम नागरिकांनी अभियानाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. खाण उद्योगाला विरोध करण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली ताकद सिद्ध करावी, असे आवाहनही श्री. गावकर यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी विविध भागांत स्थायिक असलेल्या शिरगाववासीयांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रामचंद्र सुर्या गावकर, आनंद कृष्णा गावकर, नकुळ गोपाळ गावकर, सुरेश बाबनी गावकर, दीपक गावकर, प्रकाश अर्जुन गावकर आदींनी या मोहिमेला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. शिरगावातील प्रत्येक नागरिकाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन या सर्वांनी केले. शिरगावाबाहेरील गावच्या नागरिकांनीही दिलीप भास्कर गावकर यांच्याशी ९८२२१८१५६३ या क्रमांकावर संपर्क साधून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

1 comment:

आपली प्रतिक्रिया नोंदवा