Wednesday, 19 August 2009

काणकोण किनारपट्टीतील ३२ बेकायदा बांधकामे पाडली

काणकोण व आगोंद, दि. १८ (प्रतिनिधी): काणकोण पालिकेने आज (दि. १८) केलेल्या एका धडक कारवाईत काणकोण पालिका क्षेत्रातील किनारपट्टी भागातील (सी. आर. झेड.) क्षेत्रात असलेली ३२ बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने पाडली.
त्यावेळी दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी दीपक देसाई, पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस, पालिका निरीक्षक येसो देसाई व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
काणकोण पालिका क्षेत्रातील पाटणे, कोळंब व पाळोळे या किनारपट्टी भागात सी. आर. झेड. नियमांचे उल्लंघन करून ही बांधकामे करण्यात आली होती. ती बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आजची कारवाई करण्यात आल्याचे काणकोण पालिकेतून सांगण्यात आले.
एका बाजूने बांधकामे पाडण्यात येत असून दुसऱ्या बाजूने सरळ सरळ सी. आर. झेड नियमांचे उल्लंघन करून पाळोळे, कोळंब भागात बेकायदा बांधकामे करण्याचे प्रकार चालूच असल्याच्या पाळोळे भागातील काही नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आज बांधकामे पाडण्याची कृती कडक पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार जून २००८ मध्ये ४८ बांधकामांविरुद्ध नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी १६ बांधकामे स्वतः मालकांनी हटविली तर राहिलेली ३२ बांधकामे आजच्या कारवाईत पाडण्यात आली. पाडण्यात आलेली बांधकामे ही निवासी घरे नसल्याचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.
बांधकाम सूडबुद्धीने पाडले?
काणकोण पालिकेने कोणतीच पूर्वसूचना न देता होवरे येथील सर्वे क्र. १०३/२ येथील बांधकाम सूडबुद्धीने पाडले असून सदर इमारतीमध्ये असलेले सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सामान पाडलेल्या बांधकामाखाली गाडले गेले असल्याचा आरोप शशिकांत भगत यांनी केला आहे. सदर बांधकाम १९९१ पूर्वीचे असून किनारा नियमन कायद्याखाली बांधकामाचा खटला चालू आहे. पालिकेने आगाऊ सूचना दिली असती तर इमारतीमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तू हटविल्या असत्या असेही भगत यांचे म्हणणे आहे.
गणेश चतुर्थीच्या या दिवसात बांधकामे पाडण्यात आल्याने पाळोळे, कोळंब भागात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा