Monday, 3 August 2009

पेडणेकर कुटुंब असे कसे अचानक बेपत्ता ?

पोलिसांबद्दल जनतेमध्ये संशय
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - बाल न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार प्रकरणी रोज पोलिस स्थानकात हजेरी लावणारा संशयित आरोपी औदुंबर पेडणेकर आणि त्यांची पत्नी अचानक फरारी कशी होतात, असा प्रश्न नागरिकांना पडलेला असून शनिवार आणि रविवार हे न्यायालयाला सुट्टीचे दिवस असल्याने हे कुटुंब अचानक गायब झाल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून अटकपूर्व जामीन अर्ज रद्द होताच अटक का केली नाही, असाही प्रश्न जागृत नागरिकांनी उपस्थित केला आहे. याच कारणामुळे पोलिसांवरही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उद्या सोमवारी पेडणेकर दांपत्य आणि मेहुणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी पेडणेकर, त्याची पत्नी मिनाक्षी आणि रेखा ऊर्फ टिना वाघेला यांना शनिवारी सकाळी बाल न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून त्वरित अटक करण्याचा आदेश देताच पोलिसांनी तिन्ही संशयित फरारी असल्याचे जाहीर करून हात वर केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संशयितांना फरारी होण्यास पोलिसांनी सूट दिली नाही ना, अशी शंका आज काही संस्थांच्या सदस्यांनी खाजगीत बोलताना व्यक्त केली.
सात महिन्यांपूर्वी पिडीत मुलगी अन्य एका व्यक्तीच्या घरात मोलकरीण म्हणून नोकरीला होती. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीकडून त्या मुलीला पेडणेकर यांच्या घरात कोणी आणले, याचा तपास अद्याप पोलिसांनी लावलेला नाही. गोव्यात लहान मुलांना मोलकरीण म्हणून कामाला ठेवण्यास अल्पवयीन मुली पुरवण्याची मोठी टोळी कार्यरत असून त्या टोळीला त्वरित अटक करण्याची मागणी केली जात आहे. आज त्या मुलीच्या आजीची पुन्हा पर्वरी पोलिस स्थानकात जबानी घेण्यात आली. यावेळी तिने आपल्या नातीला पेडणेकर याच्या घरात मोलकरीण म्हणून नोकरीला ठेवल्याची कुठली कल्पना नव्हती, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलीला मी पेडणेकर यांच्याकडे घरकामासाठी सोडलेले नाही, अशी भूमिका तिच्या आईने घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा