Wednesday, 5 August 2009

दीपालीचा "व्हिसेरा' अडीच वर्षे पडून

- विरोधकांकडून गृहमंत्री धारेवर
- तपास अधिकाऱ्यावर कठोर
कारवाई करण्याची मागणी

पणजी, दि.४ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याच्या क्रौर्याला बळी पडलेल्या अनेक मुलींपैकी दीपाली ज्योतकर या मुलीचा व्हिसेरा गेली अडीच वर्षे कोणत्याही कार्यवाहीविना तसाच ठेवून देण्याच्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल आज विधानसभेत अनेक सदस्यांनी तपास अधिकारी हिरू कवळेकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. कवळेकरांचा हा प्रमाद अत्यंत गंभीर असून प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री रवी नाईक यांनी नंतर या सदस्यांना दिले.
काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाला वाचा फोडून हा मुद्दा आक्रमक पद्धतीने मांडला. या घटनेच्या अनुषंगाने सदस्यांनी पोलिस खात्यावर अकार्यक्षमतेचे संतप्त आरोपही केले. सदर पोलिस अधिकाऱ्याला १ फेब्रुवारी २००७ रोजी संशयास्पदरीत्या मृत पावलेल्या दीपालीचा व्हिसेरा मिळाला होता. तिचा खून झाला असावा असा संशय असल्यानेच व्हिसेरा गोळा केला होता; परंतु हा व्हिसेरा चक्क ७ जुलै २००९ रोजी म्हणजेच तब्बल अडीच वर्षांनी चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. हा इतका विलंब का? एखाद्या खून प्रकरणातला व्हिसेरा इतका काळ ठेवता येतो का? असे अनेक प्रश्न विचारून पै खोत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर आदींनी गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. त्या अधिकाऱ्याची ही कृती अत्यंत आक्षेपार्ह असून त्याची चौकशी सुरू असल्याचे रवी नाईक यांना सांगावे लागले. चौकशीचा प्राथमिक अहवाल येताच त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असेही रवींनी सांगितले. व्हिसेरा अहवाल इतक्या दीर्घ काळपर्यंत ठेवता येत नाही. त्याने तो का ठेवला, हे माहीत नसल्याचे रवी म्हणाले.
हा प्रश्न या प्रकरणापुरताच मर्यादित नसून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारे हे वर्तन असल्याचे पै खोत व पर्रीकर यांनी सांगितले. सभापती प्रतापसिंग राणे यांनीही व्हिसेरा अडीच वर्षे ठेवून दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले व संबंधित अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा, असे रवींना बजावले. यात अधिकारी आणि संबंधितांचे साटेलोटेही असण्याची शक्यता असल्याचे सभापतींनी नमूद केले.
खून कसा झाला किंवा संबंधित व्यक्ती कशामुळे मरण पावली, हे शोधून काढण्याच्यासाठी व्हिसेरा महत्त्वाचा पुरावा मानलो जातो, असेही राणेंनी रवींच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी हा व्हिसेरा स्वतःच्या उशाशी ठेवून दिला; परंतु विधानसभेत प्रश्न आल्याचे कळताच तो चाचणीसाठी पाठवून देण्यात आला, असा आरोप पै खोत यांनी केला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा