Tuesday, 7 October 2008

मेगा प्रकल्पांना विरोधाची धार तीव्र होत चालली...


'गाव घर राखण मंच' व अन्य संघटनांतर्फे पणजीत मेगा प्रकल्पांविरुद्ध काढण्यात आलेला मोर्चा. (छाया: सुनील नाईक)

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) ः मुख्यमंत्री दिगंबर कामत हे वारंवार आपले सरकार "आम आदमी'चे असल्याची शेखी मिरवतात; परंतु त्यांच्या सरकारकडून "आम आदमी' चे खच्चीकरण सुरू आहे. या सरकारातील काही नेत्यांनी गोवा जणू विक्रीस काढला असून ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आपणच या भूमीत पोरके होऊ, अशी भीती "गाव घर राखण मंच' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली.
राज्याच्या विविध भागांत सुरू असलेले मेगा प्रकल्प, जमीनविक्री, बेकायदा खाण उद्योग आदींविरोधात निषेध मोर्चा या संघटनेने आज पणजीत मोर्चा काढला होता. नंतर येथील आझाद मैदानावर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या जाहीर सभेत राज्यातील सुमारे पंचवीस विविध बिगर सरकारी संस्था तथा नागरिक मंचाचे मिळून पाचशेवर लोक सहभागी झाले होते. "गोवा प्रादेशिक आराखडा २०२१' संमत होईपर्यंत राज्यातील सर्व वादग्रस्त व्यावसायिक प्रकल्प तथा मेगा प्रकल्प त्वरित स्थगित ठेवावेत,असा ठराव सभेत संमत करण्यात आला. वादग्रस्त प्रादेशिक आराखडा २०११ रद्द केला खरा; परंतु या आराखड्याअंतर्गत सुरू झालेल्या प्रकल्पांची कामे जोमाने सुरू आहेत, असा आरोप सभेत करण्यात आला. सरकारकडून सामान्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. येथील भूमीपुत्रांवरच घाला घालण्याचे षड्यंत्र काही राजकीय नेत्यांनी रचले असून ही स्थिती अशीच कायम राहिल्यास गोमंतकीय पेटून उठेल, हे सरकारने ध्यानात ठेवावे,असा इशारा या सभेत देण्यात आला.
अँथनी डिसिल्वा यांनी गोव्यातील विविध भूखंड विक्रीसाठी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर विक्रीस असल्याच्या जाहिरातींचा मारा सुरू असल्याचे सांगितले. दिल्ली येथे अलीकडेच एका बड्या वृत्तपत्र कंपनीकडून गोव्यातील जमिनींच्या विक्रीचे प्रदर्शनच घडवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यास प्रसिद्ध गोमंतकीय फॅशन डिझायनर व्हेंडल रॉड्रिगीस यांनी नकार देऊन गोव्याबाबत असलेले प्रेम प्रकट केले, असेही ते म्हणाले.
मडगावचे नगरसेवक ऍथल लोबो यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकार जनतेच्या भावनांशी खेळ करीत आहे. अजूनपर्यंत लोक शांततामय मार्गाने निषेध नोंदवत आहेत. तरीसुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करू लागले तर पुढील परिणामांना तेच जबाबदार ठरेल,असा इशाराही लोबो यांनी दिला. यावेळी संघटनेतर्फे नगर व नियोजन खाते तथा पंचायत संचालनालयास निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचे वाचन संघटनेच्या निमंत्रक जेराल्डीन फर्नांडिस व सॉर्टर डिसोझा यांनी केले.
---------------------------------------------------
ज्येष्ठ महिलाही संतापल्या
या सभेत मडगाव व बाणावली येथील दोन ज्येष्ठ महिलांनी व्यासपीठावर उभे राहून यापुढे मतांची मागणी करण्यासाठी येणाऱ्या राजकारण्यांच्या आमिषांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन केले.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

    Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा