Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 July, 2011

‘तो’ कुत्रा मेल्याने पणजी धास्तावली

घाबरण्याचे कारण नाही : डॉ. पालेकर
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): पणजीत काल दि. ७ रोजी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल ४४ जणांचा चावा घेतलेला ‘तो’ पिसाळलेला कुत्रा आज मेल्यामुळे त्याने चावा घेतलेल्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी येऊनही स्वस्थ बसलेल्या पणजी महापालिकेची यामुळे झोप उडाली आहे.
काल संपूर्ण पणजी शहरात भटकंती करून एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे ४४ जणांचा चावा घेऊन एकच खळबळ माजवली होती. या घटनेचे वृत्त आज प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने चावा घेतलेल्या अन्य दोघांनी आरोग्यकेंद्रात येऊन उपचार करून घेतले. त्यामुळे हा आकडा आता ४६ झाला आहे. काल अथक प्रयत्नाअंती जेरबंद करण्यात आलेला सदर कुत्रा आज पहाटे मृत झाल्याची वार्ता पसरताच तो ज्यांना चावला होता त्यांच्या उरात धडकी भरली. कुत्रा मृत झाल्याने तो रॅबीजग्रस्त असण्याची शक्यता बळावली आहे.पणजी नगर आरोग्याधिकारी डॉ. अनंत पालेकर यांनी मात्र, कुणीही घाबरून जाण्याचे कारण नसून कुत्र्याने ज्यांचा चावा घेतला आहे त्यांनी संपूर्ण उपचार करून घ्यावेत, असे आवाहन केले आहे. त्यांनी यासंबंधी महापालिकेच्या आयुक्तांना एक पत्र पाठवून शहरातील भटकी गुरे व कुत्र्यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडे मात्र यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. पणजी शहरातच सुमारे दोन ते तीन हजार भटकी कुत्री असावीत व त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताबडतोब लसीकरण करण्याचे एक आव्हानच महापालिकेसमोर उभे राहिले आहे. या कामात पशू कल्याण सोसायटीची मदत घेता येईल.
पणजी महापालिकेचे नगरसेवक शुभम चोडणकर यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले लोक उपचारासाठी दाखल झाले हे जरी खरे असले तरी या कुत्र्याने इतर जनावरांचाही चावा घेण्याची शक्यता फेटाळता येत नाही व त्यामुळे या जनावरांनाही या रोगाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंबंधी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना आखण्याची गरज आहे, असेही त्यांनी ‘गोवादूत’शी बोलताना सांगितले.
रॅबीजचा धोका नाही!
या संदर्भात पणजी नागरी आरोग्यकेंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पालेकर यांची भेट घेऊन त्यांना ‘रॅबीज’बाबत विचारले असता ते म्हणाले की, एखाद्या कुत्र्याने चावा घेतला तर लगेच ती जखम स्वच्छ पाण्याने व साबणाचा वापर करून धुऊन घ्यावी. कुत्र्याच्या लाळेमधूनच रॅबीजचे जंतू बाहेर पडतात. गावठी उपचार करण्याच्या नादात न पडता तात्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार करावेत. कुत्र्याने चावा घेतला तरी रॅबीज होण्याचे प्रमाण फक्त १५ टक्के असतो व त्यात उपचार उपलब्ध असल्याने घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही, असेही ते म्हणाले. पणजी नागरी आरोग्यकेंद्रात ८० जणांना एकाचवेळी पुरतील एवढी रॅबीजविरोधी औषधे उपलब्ध आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. ‘रॅबीज’ झालेल्या कुत्र्याने चावा घेतला तर पोटात कुत्र्याची पिल्ले होतात ही समजूत चुकीची आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतची सर्व जबाबदारी पणजी महापालिकेने सांतीनेज येथील ऍनिमल वेल्फेअर केंद्राकडे दिली असून या केंद्राच्या प्रमुख अँजेला काझी या तेथील सर्व व्यवस्था पाहतात.

No comments: