Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 July, 2011

सभापती राणे यांच्याकडून चर्चिल, रेजिनाल्डना मुदत

‘तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा’
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): ‘सेव्ह गोवा फ्रंट’ पक्षाचे कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण करून सार्वजनिक बांधकाम खाते पदरात पाडून घेतलेले चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांना त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवरील भूमिका मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत आज सभापती प्रतापसिंग राणे यांनी दिली.
आज यासंबंधी हजर राहण्याचे आदेश सभापतींनी त्यांना दिले होते. त्यानुसार, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड तसेच अपात्रता याचिका दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मिकी पाशेको सुनावणीसाठी उपस्थित राहिले. चर्चिल व रेजिनाल्ड यांच्यासोबत चर्चिल यांची कन्या ऍड. वालंका आलेमाव हजर होत्या.
‘सेव्ह गोवा फ्रंट’ या पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले चर्चिल व रेजिनाल्ड यांनी संपूर्ण कार्यकारिणीसह या पक्षाचे कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केले होते. या विलीनीकरणाला पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांनीच आव्हान दिले होते व हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आज चर्चिल व रेजिनाल्ड यांच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सभापतींना सांगितले. दरम्यान, मिकी पाशेको यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच जारी केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीची अधिसूचना सभापतींना सादर केली. या अधिसूचनेत ‘सेव्ह गोवा फ्रंट’ या राजकीय पक्षाला मान्यता देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला. ज्याअर्थी हा पक्ष अस्तित्वात आहे, त्याअर्थी या पक्षाचे कायदेशीर विलीनीकरण झालेले नाही, हे स्पष्ट होते व त्यामुळेच या व्दयीला तात्काळ अपात्र करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. यासंबंधी राज्य संयुक्त निवडणूक अधिकार्‍यांनी ‘सेव्ह गोवा फ्रंट’ पक्षाला मान्यता असल्याचे व त्याचे चिन्ह ‘विमान’ असल्याची ग्वाही दिलेले पत्र सभापतींना सादर केले.
याप्रकरणी चर्चिल व रेजिनाल्ड यांच्या वकिलांनी आपली भूमिका मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्याची विनंती सभापतींकडे केली व ती मान्य करण्यात आली. सभापतींच्या दालनातून बाहेर पडलेल्या मिकी पाशेको यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी त्यांना गराडा घातला असता ही याचिका सादर करून तीन वर्षे उलटली तरीही निवाडा होत नाही; आता पुढील तीन आठवड्यांत तरी काय नवीन होईल, असा नाराजीचा सूर त्यांनी व्यक्त केला. चर्चिल व रेजिनाल्ड यांनी मात्र यासंबंधी आपली भूमिका सभापतींसमोर स्पष्ट करणार असून अंतिम निर्णय त्यांनाच घ्यावयाचा आहे, एवढेच सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.

No comments: