Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 July, 2011

पालिकेतील सदस्य नियुक्तीवरून बाबूश-पारेख यांच्यात संघर्ष

पणजी, दि.२२ (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघातून आपल्या पत्नीला कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आमदार व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महापालिका निवडणुकीत वैर पत्करलेल्या उदय मडकईकर यांच्याशी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी लीना मडकईकर यांना महापालिकेच्या नियुक्त सदस्य म्हणून घेण्याचा डाव त्यांनी आखला आहे. मात्र यामुळे पणजीचे महापौर यतीन पारेख नाराज झाले आहेत. एक नियुक्त सदस्य निवडलेला असताना आणखी चार सदस्य नेमणे शक्य नाही, असे चारच दिवसांपूर्वी श्री. पारेख यांनी जाहीर केले होते. मात्र जबरदस्त दबावतंत्र वापरून बाबूश यांनी पारेख यांना आपले म्हणणे बदलण्यास भाग पाडले आहे. महापौर पारेख यांनी जरी बाबूश यांच्या म्हणण्याला सध्या मान्यता दिली असली तरी बाबूश आणि पारेख यांच्यातील संघर्ष यानिमित्ताने उघड झाला आहे.
शिक्षणमंत्री मोन्सेरात हे निवडणुकांवर डोळा ठेवून आपली धोरणे बदलण्यात तरबेज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवताना आपल्या पत्नीला कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून बाबूश यांनी महापालिका निवडणुकीत वैर पत्करलेल्या व बाबूश यांनी खास प्रयत्न करून पाडाव केलेल्या उदय मडकईकर यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने याचा वचपा काढण्यासाठी ताळगावातूनच बाबूश किंवा त्यांच्या पत्नी जेनिेफर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी मडकईकर करत आहेत. त्यामुळे मोन्सेरात यांनी मडकईकरांशी जवळीक साधत त्यांना अपक्ष म्हणून लढण्यापासून परावृत्त करण्याची नीती यांनी आखली आहे. त्यासाठी लिना मडकईकर यांना पणजी महापालिकेच्या नियुक्त नगरसेविका म्हणून घेण्याची तयारी बाबूश यांनी केली आहे. या योजनेनुसार महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या कट्टर समर्थकांना नियुक्त नगरसेवक म्हणून महापालिकेवर घेण्याचे बाबूशनी ठरवले आहे. या चार सदस्यात लीना उदय मडकईकर यांचे नाव आहे.
चार सदस्यांचा विचार आहे : पारेख
दरम्यान, महापौर यतीन पारेख यांनी एका सदस्याच्या निवडीचा आपला विचार बदलला असून ‘चार नियुक्त सदस्य निवडण्यासाठी सरकारकडे चार नावे पाठवली जातील’ व सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर चार नियुक्त नगरसेवक निवडले जातील अशी माहिती महापौर यतीन पारेख यांनी दिली आहे. मात्र या विषयावरून शिक्षणमंत्री व महापौर यांच्यात बराच वाद झाल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
चार सदस्य नियुक्तीस विरोध : वैदेही नाईक
बाबूश मोन्सेरात हे आपल्या पराभूत साथीदारांना मागील दाराने महापालिकेत बसवण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करत आहेत. यापूर्वी पेट्रासिया पिंटो यांना नियुक्त सदस्य म्हणून घेतलेले असताना आणखी चार सदस्य घेण्यास आपल्या गटाचा विरोध आहे. आपल्या गटाचे मिनीनो डिक्रुझ यांना नियुक्त सदस्य करावे असा आग्रह आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी गटनेत्या वैदेही नाईक यांनी दिली आहे.

No comments: