Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 July, 2011

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे

ठाणे सत्तरी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव
वाळपई, दि. १९ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाल्यास लहान मुलांच्या भवितव्यावर व मानसिकतेवर विपरीत आणि गंभीर परिणाम होतील. सरकारने घेतलेला प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाचा निर्णय अत्यंत घातकी आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असायला हवे असा ऐतिहासिक ठराव सभापती प्रतापसिंग राणे व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या सत्तरी मतदारसंघातील ठाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर ठाण्याचे सरपंच प्रकाश गावकर, सचिव सर्वेश गावकर, पंच गुरुदास गावस, अर्जुन केरकर, दशरथ गावकर, सौ. सुरंगा नाईक, उमाकांत गावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या ठरावाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी हात वर करावेत असे आवाहन यावेळी सरपंचांनी केल्यानंतर एकाही ग्रामस्थाने हात वर केला नाही त्यामुळे हा ठराव सर्वानुमते संमत झाला.
ठरावाच्या समर्थनार्थ बोलताना प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून करण्याचा सरकारचा निर्णय सत्तरी तालुक्यावर आघात करणारा आहे. त्यामुळे लहान मुलांचे नुकसान तर होणारच परंतु त्याचबरोबर येथील संस्कृतीही नष्ट होणार आहे, असे सुहास नाईक यांनी सांगितले.
पंच गोविंद कोरगावकर यांनी यावेळी सांगितले की, आज मातृभाषेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपले सर्वप्रकारचे मतभेद विसरून लढायला हवे. हा राजकीय प्रश्‍न नसून सामाजिक प्रश्‍न आहे असे प्रतिपादन केले.
हा ठराव सुहास नाईक यांनी मांडला तर ठरावास दिलीप नाईक यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेत लोकांची लक्षणीय उपस्थिती होती.
दरम्यान, सत्तरी भाषा सुरक्षा मंचाने ठाणे पंचायतीने घेतलेल्या या ठरावाबद्दल पंचायतीचे अभिनंदन केले आहे. तसेच असाच ठराव सत्तरीतील प्रत्येक पंचायतीने घ्यावा असे आवाहन केले आहे.

No comments: