Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 July, 2011

देशप्रभू व परूळेकर गटांत जुंपली

राष्ट्रवादीतील वाद हातघाईवर
पणजी, दि .९ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचे रूपांतर आज हमरीतुमरीवरून चक्क हातघाईवर आल्याने पक्षात प्रचंड असंतोष पसरला आहे. प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांचा समर्थक गटही सहभागी झाला व त्यात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. देशप्रभू व सुरेश परूळेकर यांच्यात झालेल्या धमासानाचे पर्यवसान हातघाईवर होण्याचे तेवढे बाकी होते. अखेर या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी हस्तक्षेप करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
जितेंद्र देशप्रभू यांनी राष्ट्रवादीच्या प्रभारी भारती चव्हाण यांच्यावर केलेल्या बेछूट आरोपांमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सुरेश परूळेकर यांना ज्येष्ठ उपाध्यक्षपद बहाल करण्यात आर्थिक व्यवहार झाला तसेच अनेकांवर विविध पदांची खैरात करून भूखंड व पैशांचे व्यवहार झाल्याचेही देशप्रभू यांनी म्हटले होते. देशप्रभू यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज खास कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला बहुतांश सर्वच कार्यकारिणी सदस्य हजर होते. श्रीमती भारती चव्हाण या गोव्यात आल्या असून त्यांचे वास्तव येथील एका हॉटेलात आहे. त्यांनी दिलेल्या आदेशावरून जितेंद्र देशप्रभू यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे कारस्थान रचल्याचा सुगावा लागताच देशप्रभू यांनी युवा राष्ट्रवादी व सेवा दल यांच्या पाठिंब्याने चव्हाण समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी श्री. परूळेकर व श्री. देशप्रभू यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर श्री. परूळेकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. एकीकडे पक्षाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी अंतर्गत वादात हस्तक्षेपाची मागणी करणारा ठराव घेतला तर दुसरीकडे भारती चव्हाण यांचे प्रभारीपद काढून घेण्याची मागणी देशप्रभू समर्थकांनी केली.
दरम्यान, भारती चव्हाण या गोव्यात असूनही त्यांनी पत्रकारांची भेट घेण्याचे टाळले. संध्याकाळी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करून त्यांनी उद्या १० रोजी पत्रकारांना संबोधीत करण्याचे ठरवले आहे. जितेंद्र देशप्रभू यांनी केलेल्या गंभीर आरोपांना त्या कोणते प्रत्युत्तर देतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments: