Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 July, 2011

मडगावात चोरांचा धुमाकूळ

दोन सराफी दुकाने, एक चर्च फोडली - ८ लाखांवर डल्ला
- तिजोरी टाकून दिल्याने मोठा ऐवज वाचला
मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी): मडगावात काल एकाच रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालताना तीन ठिकाणी चोर्‍या करून तब्बल आठ लाखांचा ऐवज लुटला. येथील दोन सराफी दुकानात व जुन्या बाजारांतील होली स्पिरिट चर्चमध्ये त्यांनी डल्ला मारला. तथापि, एका जवाहिर्‍याच्या दुकानातून पळविलेली तिजोरी लोकांनी हटकताच चोरांनी तेथेच टाकून दिल्यामुळे त्यातील मोठा ऐवज बचावला. अशा प्रकारे दुकानांतील तिजोरीच उचलून नेण्याचा हा पहिलाच प्रकार असून तिन्ही चोर्‍यांची पद्धत पाहिली तर त्यामागे एकच टोळी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीचच्या सुमारास एका मोटरसायकलवरून दोघेजण एक पेटी घेऊन जात असल्याचे पाहून काजाराचा कार्यक्रम आटोपून शिरवडे येथे आपल्या घरी परतणार्‍या काही तरुणांनी त्यांना हटकले असता ती वस्तू व मोटरसायकलही तेथेच टाकून ते पसार झाले. त्यामुळे संशय येऊन त्या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता शिरवडे येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या आवार भिंतीवरून आत उडी टाकून ते पसार झाले. त्यानंतर त्या तरुणांनी तेथील सुरक्षा रक्षकाला उठवून एकंदर प्रकार सांगितला व त्यांच्या मदतीने आत सर्वत्र शोध घेतला; पण त्यांचा पत्ता लागला नाही.
त्यानंतर त्यांनी मडगाव पोलिसांना वर्दी दिली असता पोलिसांनी येऊन मोटरसायकल व तिजोरी ताब्यात घेतली. परिसरात शोध घेतला असता शिरवडे मशिदीजवळच्या रामनाथ रायकर यांचे सोन्या चांदीचे दुकान फोडलेले आढळून आले. दुकानात येऊन रायकर यांनी पाहणी केली असता ती तिजोरी त्यांचीच असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी तेथून साधारण ७ लाखांचे दागिने पळविल्याचे आढळून आले. तिजोरीत मोठ्या प्रमाणात असलेला ऐवज मात्र सुदैवाने हाती लागला. तिजोरीचे हँडल मोडलेले होते. त्यावरून त्यांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला होता व तो साध्य न झाल्याने त्यांनी ती घेऊनच पळ काढला होता, असा कयास आहे.
दरम्यान, आज सकाळी येथील जगन्नाथ बिल्डिंगमधील कृष्णदास रायकर यांचे सोन्याचांदीचे दुकानही फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानातून दीड किलो चांदी चोरीस गेली. त्याची किंमत एक लाख रुपये होते. ते दुकानही शिरवडे प्रमाणेच कुलूप कापून फोडले होते. तेथे कागदात गुंडाळलेल्या दोन नव्याकोर्‍या ऍक्सो ब्लेड्स व स्क्रू ड्रायव्हरही आढळून आला. पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत.
होली स्पिरिट चर्चलाही दणका
जुन्या बाजारातील होली स्पिरिट चर्चकडेही काल रात्री चोरट्यांनी मोर्चा वळविला व खिडकीचे गज कापून आत शिरकाव केला. तेथील दोन फंडपेट्या फोडून साधारण दोन ते तीन हजारांची रक्कम त्यांनी पळविली अशी तक्रार फादर अविनाश रिबेलो यांनी केली आहे. तेथील सायबिणीची प्रतिमा असलेली व चबुतर्‍यावर असलेली पेटी उपटण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला, पण त्यात त्याचे हँडल तुटले व त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला असावा.
या तीन चोर्‍यांनी आज शहरात खळबळ माजली. नंतर पोलिस अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे व निरीक्षक संतोबा देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा तपास करण्यासाठी श्‍वानपथकाचीही मदत घेण्यात आली.

No comments: