Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 July, 2011

व्यावसायिक महाविद्यालयेही पेटली!

अभियांत्रिकी फर्मागुढी, फा. आग्नेल,
मल्लिकार्जुन महाविद्यालयांत निदर्शने

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): कामत सरकारच्या माध्यम निर्णयाविरोधातील वणवा महाविद्यालयांत झपाट्याने पसरू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी खांडोळा व केपे येथील सरकारी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी माध्यमप्रश्‍नी ‘काळा दिवस’ पाळून सरकारचा जोरदार निषेध नोंदवला होता. आज या निर्णयाविरोधात व्यावसायिक महाविद्यालयेही पेटून उठली. फर्मागुढी येथील सरकारी अभियांत्रिकी, वेर्णा येथील फा. आग्नेल व काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आज ‘काळा दिवस’ पाळून सरकारवर तुफान हल्लाबोल केला.
वरील तिन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आज काळे कपडे परिधान करून सरकारी निर्णयाच्या निषेधार्थ ‘काळा दिवस’ पाळला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने दुपारी १२ ते १ या दरम्यान आपापल्या महाविद्यालयाच्या गेटसमोर कामत सरकारविरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. मातृभाषांचा गळा घोटणारा हा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, समाजातील सर्वांत प्रबळ शक्ती म्हणून गणल्या जाणार्‍या विद्यार्थिवर्गाने आता उग्र रूप धारण केल्याने कॉंग्रेस सरकारवर हे प्रकरण शेकणार असल्याचे बोलले जात आहे.

No comments: