Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 July, 2011

महानंदला जन्मठेप

वासंती गावडे खूनप्रकरणात दोषी
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): वासंती गावडे या तरुणीच्या खूनप्रकरणी सीरिअल किलर महानंद नाईक याला आज जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, १ लाख ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. महानंद याला ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा आहे. यापूर्वी त्याला सुशीला फातर्पेकर या तरुणीच्या खून प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सोळा खून केल्याचे आरोप सीरिअल किलर महानंद नाईक याच्यावर असून गेल्या महिन्यात त्याला वासंती हिच्या खून प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. यापूर्वी महानंदला बलात्कार प्रकरणात सात वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
१९९५ मध्ये वासंती हिचा महानंदने खून केला होता. त्यावेळी वासंती ही महानंद याच्यासोबत जाताना तिच्या चुलत भावाने पाहिले होते. हीच साक्ष त्याला दोषी ठरवण्यात महत्त्वाची ठरली. तसेच, अन्य १२ जणांच्या साक्षी यावेळी न्यायालयाने नोंद करून घेतल्या.
लग्नाचे आमिष दाखवून वासंती हिला बेतोडा-फोंडा येथे नेऊन तिचा तिच्याच गळ्यातील दुपट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला होता.

No comments: