Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 July, 2011

पिसाळलेल्या कुत्र्याचा राजधानीत धुमाकूळ

तब्बल ४४ जणांचा घेतला चावा
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): पणजी शहरात आज एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल ४४ जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली. मळा येथे लोकांना चावण्यास सुरुवात केलेल्या या कुत्र्याने त्यानंतर शहरात विविध ठिकाणी ४४ लोकांवर हल्ला केला. शेवटी अथक प्रयत्नाअंती चर्च चौकाजवळ प्राणी कल्याण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची रवानगी सांतइनेज येथील श्‍वान संवर्धन केंद्रात करण्यात आली.
पणजीत अलीकडच्या दिवसांत भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. गेल्याच महिन्यात अशाच एका कुत्र्याने २२ लोकांचा चावा घेण्याचा प्रकार ताजा असताना आज दुसर्‍या एका पिसाळलेल्या कुत्र्याने ४४ लोकांना आपले लक्ष्य बनवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्यांत शालेय विद्यार्थी, महिला तथा वयोवृद्ध लोकांचाही समावेश आहे. जखमींची एकच रीघ येथील आरोग्यकेंद्रात लागली होती. सुमारे १८ जणांना हा कुत्रा अतिशय कडकडून चावल्याने त्यांना गोमेकॉत पाठवण्यात आले. यांतील २९ जणांना ‘अँटी रॅबीज’ लस देण्यात आली. या प्रत्येक लसीची किंमत ६ हजार रुपये आहे.
मळा येथे या कुत्र्याने हैदोस घातल्याची माहिती मिळताच येथील नगरसेवक शुभम चोडणकर यांनी तात्काळ ही माहिती महापौर यतीन पारेख यांना दिली. यावेळी तात्काळ पशू कल्याण संस्थेच्या कार्यकर्त्यांना या कुत्र्याला पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. मळा ते जयराम कॉम्प्लेक्स, तिथून कामत सेंटर, चर्च चौक आदी ठिकाणी भ्रमंती करून या कुत्र्याने ४४ जणांचा चावा घेतला. सरतेशेवटी चर्च चौकाजवळ त्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या समस्येची वेळोवेळी आपण महापालिका बैठकीत कल्पना दिली आहे. हा पिसाळलेल्या कुत्र्याने इतर कुत्र्यांचा चावा घेतला तर त्यांनाही रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या भटक्या कुत्र्यांच्या विरोधात ताबडतोब एक मोहीम उघडून त्यांना ताब्यात घेण्याची गरज आहे, असेही श्री. चोडणकर म्हणाले.

No comments: