Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 July, 2011

भजनी कलाकारांच्या निष्ठेला तोड नाही : काकोडकर

पणजी, दि. ७ : गोव्याची सांस्कृतिक परंपरा सांभाळण्यात नेहमीच ज्यांचा मोलाचा वाटा राहिला, अशा गावागावांतील, खेड्यापाड्यांतील भजनी कलाकारांनी केवळ खुर्चीच्या मोहाकरता मातृभाषेचा गळा घोटण्याचा सौदा करणार्‍या सत्ताधीशांना काल कला अकादमीत झालेल्या बैठकीत एकजुटीने आणि मातृभाषेवरील निष्ठेने जो स्वाभिमानाचा व सरकार-निषेधाचा झटका दिला त्याला तोड नाही, अशा शब्दांत भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीने निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी सर्व महिला व पुरुष भजनी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
३२ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा हवाला देऊन, ‘भजनी स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर दिगंबर कामत सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविता येणार नाही’, अशी सरकार पुरस्कृत दडपशाही कला अकादमीने करून पाहिली. मात्र, या दडपणाला भीक न घालता स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेऊन जे स्वभाषा प्रेम, स्वाभिमानाचे तेज आणि त्यागाचे दर्शन भजनी कलाकारांनी घडवले ते सांस्कृतिक क्षेत्राला निश्‍चितच झळाळी देणारे ठरेल. तसेच, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाला त्यामुळे मोठी बळकटी आणि आत्मविश्‍वास प्राप्त होईल, असे मंचाने म्हटले आहे.
मातृभाषेचे मारेकरी आणि सत्तेचे लाचार ठरलेले आमदार व मंत्री यांच्यावरील बहिष्कार सत्रात यापुढेही भजनी कलाकारांची साथ मातृभाषाप्रेमी गोमंतकीयांना लाभेल, असा विश्‍वास भारतीय भाषा सुरक्षा मंचने व्यक्त केला आहे.

No comments: