Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 July, 2011

‘शिवराळ’ पोलिस अधिकारी धास्तावले

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): ‘सीआयडी’ विभागाचा पोलिस वाहन चालक चंद्रू गावस याने वरिष्ठांकडून होणार्‍या सतावणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याने पोलिस खात्यातील अनेक ‘शिवराळ’ तथा मग्रूर पोलिस अधिकार्‍यांची पाचावर धारण बसली आहे. गेली अनेक वर्षे मुकाटपणे अशा पद्धतीचा छळ सहन करणारे अनेक शिपाई आता तोंड उघडू लागल्याने या अधिकार्‍यांचे धाबेच दणाणले आहेत. वरिष्ठांकडून कोणत्याही पद्धतीचा छळ होत असल्यास पुढे या व आपल्याकडे तक्रार करा, असे आवाहन पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी करून या कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
पोलिस खात्यात वरिष्ठांकडून निम्न स्तरावरील कर्मचार्‍यांची सतावणूक होण्याचा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. यापूर्वी अशा छळाला कंटाळून अनेकांकडून स्वतःचे जीवन संपवण्याचे प्रयत्नही झाले. परंतु, त्यांची जाहीर वाच्यता न झाल्याने ही प्रकरणे खात्याअंतर्गत मिटवण्यात आली. आपल्या ‘बॉस’कडून होणार्‍या सतावणुकीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणे म्हणजे ‘आगीतून फुफाट्यात पडणे’, अशीच मानसिकता या कर्मचार्‍यांची बनली आहे व त्यामुळेच एकतर मुकाट्याने हा छळ सहन करायचा अन्यथा आपल्या राजकीय ‘गॉडफादर’कडे धाव घेऊन बदली करून घ्यायची, अशी जणू प्रथाच पडली आहे.
विविध पोलिस स्थानकांतील तसेच मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पोलिस शिपायांना आपल्या वैयक्तिक कामांना जुंपण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यात बाजारहाट करणे, मुलांची शाळेत ने - आण करणे व इतर कामांचाही समावेश आहे. जे शिपाई या आदेशांचे पालन करीत नाहीत त्यांना जाणीवपूर्वक कष्टाची कामे देणे व रजा नाकारणे यांसारख्या सतावणुकीला सामोरे जावे लागते, असेही सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागात नव्यानेच कामाला लागलेल्या एका पोलिस शिपायाला एका महत्त्वाच्या चौकात ड्युटीसाठी ठेवून दिवसाकाठी किमान ५०० रुपये गोळा करण्याचा आदेश एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्याचे प्रकरण ‘गोवादूत’कडे आले होते. लोकांकडून पैसे गोळा करणे जमत नसलेला हा पोलिस शिपाई आपल्या पगारातील पैसे देऊन त्या अधिकार्‍याला खूष करीत होता. परंतु, ही पद्धत जास्त काळ सुरू ठेवणे त्याला जमले नाही. अखेर या जाचाला कंटाळून सैरभैर अवस्थेत आपल्या बायको व छोट्या मुलासह तो कार्यालयात आला व आपणाला ही बातमी प्रसिद्ध करायची आहे, असे सांगू लागला. हे सांगत असतानाच, ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली तर सदर अधिकारी आपल्याला लक्ष्य बनवणार याची धास्तीही त्याला वाटत होती. अखेर बातमी नकोच, असे म्हणून गोंधळलेल्या स्थितीत तो घरी परतला. आता एकतर त्याने लोकांकडून पैसे गोळा करण्याची कला आत्मसात केली असावी किंवा कुणाकडे तरी आर्जव करून आपली बदली करून घेतली असावी. अशा छळाला बळी पडलेले अनेक पोलिस शिपाई व्यसनाच्या आहारी गेल्याचे तसेच मानसिक संतुलन बिघडवून बसल्याचे प्रकार पाहायला मिळतात. अतिशय शिवराळ भाषा वापरणारा एक वरिष्ठ अधिकारी सध्या दक्षिण गोव्यात काम करीत असल्याची माहितीही अनेकांनी दिली. या ‘सायबा’च्या तोंडून म्हणे शिव्यांशिवाय दुसरा शब्दच बाहेर पडत नाही.
डॉ. किरण बेदींचा कित्ता गिरवा
डॉ. किरण बेदी यांनी आपल्या पोलिस सेवेच्या कार्यकाळात या पद्धतीला छेद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या मुख्यालयात तसेच पोलिस स्थानकांत एक टपाल पेटी बसवली होती व टपाल पेटीच्या चाव्या त्यांच्याकडेच ठेवल्या होत्या. कुणीही पोलिस अधिकारी किंवा शिपायाला आपली कैफियत मांडायची असल्यास त्याने निनावी पत्र या टपालपेटीत टाकण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या पद्धतीला भरीव प्रतिसाद लाभला होता. या तक्रारींची दखल घेतली जाते, असा विश्‍वास पटल्यानंतर अनेकांच्या सूचना व तक्रारी या पेटीत जमा होऊ लागल्या व त्यांचे प्रामाणिक निरसनही त्यांनी केले. डॉ. आदित्य आर्य यांनी अशाच पद्धतीचा अवलंब करावा, अशी इच्छाही पोलिस खात्यातील अनेकांनी बोलून दाखवली आहे.

No comments: