Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 July, 2011

कॅसिनो अंडरवर्ल्डकडे

‘वॉटेड’ हुमायूं चांदीवालाच्या प्राईम कॅसिनोचे आज उद्घाटन


पणजी, दि. २१(प्रतिनिधी)
ड्रग्स माफियांच्या खुल्या वावरामुळे आधीच गुन्हेगारी जगतात बदनाम होत असलेला गोवा ‘अंडरवर्ल्ड’ माफियांचे प्रमुख केंद्र तर बनणार नाही ना, अशी भीती आता निर्माण झाली आहे. मांडवी नदीत ठाण मांडून राहिलेल्या कॅसिनोंची सूत्रे आता हळूहळू ‘अंडरवर्ल्ड’वाल्यांच्या हाती जाऊ लागली आहेत. मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला हुमायूं चांदीवाला याने आपल्या ‘प्राईम’ कॅसिनोचे उद्घाटन उद्या २२ रोजी मोठ्या दिमाखात आयोजित करून गोव्यात आपला प्रवेश केल्याची खात्रीलायक खबर प्राप्त झाली आहे.
मुंबई-अंधेरी येथे एका इमारतीत एक हजार चौरस फुटाच्या जागेत एक अलिशान जुगारी अड्डा हुमायूं चांदीवाला याने सुरू केला होता. प्रती कॅसिनो रॉयल म्हणूनही या क्लबची ख्याती पसरली होती. मुंबई पोलिसांनी या क्लबवर छापा टाकून ५.९४ लाख रुपये जप्त केले होते व तब्बल ६१ लोकांना पकडले होते. या छाप्यानंतर या क्लबचा मालक कोट्यधीश हुमायूं चांदीवाला मुंबई पोलिसांच्या वॉटेड यादीवर नोंद आहे. मुंबई विलेपार्ले येथे दीपा बारची डान्सर तरन्नूम खान हिच्या बंगल्यावर आयकर खात्याने छापा टाकून कोट्यवधींची रोकड जप्त करण्याचे प्रकरणही बरेच गाजले होते. हुमायूं चांदीवाला हा तरन्नूम खान हिच्या अत्यंत जवळचा व दीपा बारचा पार्टनर असल्याचेही नंतर उघड झाले होते.
मांडवी नदीतील एक कॅसिनो हुमायूं चांदीवाला याने चालवायला घेतल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या कॅसिनोचे नामांतर ‘प्राईम’ असे करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्या २२ रोजी आयोजित केले आहे. या उद्घाटनाला मुंबई व इतर ठिकाणच्या प्रख्यात गॅम्बलरना आमंत्रित करण्यात आल्याचेही कळते. मुख्य म्हणजे मांडवी नदीतील या कॅसिनोचा व्यवसाय हुमायूं चांदीवाला याच्याकडे देण्यासंबंधी कोणताच पत्रव्यवहार किंवा ना हरकत दाखला गृहखात्याकडून मिळवण्यात आलेला नाही. गृहखात्याच्या अवर सचिवांना विचारले असता त्यांनी यासंबंधी कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. या कॅसिनोच्या उद्घाटनाबाबत प्रसिद्ध वृत्तपत्रांतून जाहिरातबाजी सुरू असली तरी त्याची दखल गृहखात्याने अथवा पोलिसांनीही घेतल्याचे मात्र अजिबात दिसत नाही. मुख्य म्हणजे हुमायूं चांदीवाला याने चालवायला घेतलेला कॅसिनो मूळ एकाच्या नावे, जेटी दुसर्‍याच्या नावे, जहाज तिसर्‍याच्या नावे व परवाना भलत्याच्याच नावे, अशी विचित्र परिस्थिती असल्याचेही कळते. गृहखात्याकडून परवाना दिल्यानंतर प्रत्यक्ष या कॅसिनोत काय चालते याकडे कुणाचेही लक्ष नसल्यानेच त्यांच्यासाठी रान मोकळे बनल्याचेही बोलले जाते.
हुमायूं याने मुंबई पोलिसांना चकवा देत अनेक ठिकाणी आपले अड्डे चालवले होते. न्यायालयातून १३ पत्त्यांची ‘रमी’ सुरू करण्याची परवानगी मिळवणारा तो हाच हुमायूं आहे, अशीही खबर मिळाली आहे.

दाऊद इब्राहिमचे लागेबांधे...
२००५ साली मॅचफिंक्सींगच्या प्रकरणात तरन्नूम खान आणि हुमायूं यांचे संबंध असल्याचे उघडकीस आले होते. तरन्नूमचे अंडरवर्ल्डशी संबंधाचे धागेदोरेही यावेळीच उघड होऊन प्रत्यक्ष डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी थेट संबंध असल्याचीही चर्चा होती. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीथरन आणि बॉलिवूड अभिनेते आदित्य पांचोली यांची दीपा बारमध्येच तरन्नूमशी ओळख झाल्याचे पोलिस तपासास उघड झाले होते. दरम्यान, गोव्यातील सदर कॅसिनोचे नामांतर करून त्याचे नाव प्राईम कॅसिनो असे ठेवण्यात आले खरे पण त्यासंबंधीची कोणतीच माहिती गृह खात्याला देण्यात आलेली नाही. हुमायूं याने कॅसिनोच्या निमित्ताने गोव्यात केलेला प्रवेश गृहखाते व गोवा पोलिसांची झोप उडवणाराच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: