Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 July, 2011

मुळगाव खाणीचे परवाने रद्द होणार?

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): अपघातग्रस्त मुळगाव खाणीला दिलेले परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती आज राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली आहे. तर, याचा अहवाल येत्या दोन आठवड्यात न्यायालयाला कळवावा असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंडळाला दिला आहे.
सदर खाण गेल्या दोन वषार्ंपासून याठिकाणी कार्यरत असल्याचा दावा आज गोवा फाउंडेशनने न्यायालयात केला. दि. १६ जुलै रोजी सकाळी ७ च्चा दरम्यान अचानक मुळगाव येथील सेझा गोवाच्या वेदांत खाणीवरील खनिज मातीचा ढिगारा कोसळून शेतीची व कुळागाराची नासाडी झाली होती. यामुळे जवळ जवळ एक कोटी रुपयांची हानीही झाली. तसेच, यामुळे आलेल्या पाण्याच्या लोटामुळे वाहत जाताना तिघे जण सुदैवाने बचावले होते. ही खाण सुरू ठेवणे धोकादायक असून पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचाही दावा, ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी आज न्यायालयात केला.
गोवा फाउंडेशनने मुळगाव आणि लामगाव येथील या खाणींच्या आराखड्याचा अभ्यास केला असून आराखड्यानुसार या खाणी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक धोकादायक स्थितीत मातीचे ढिगारे त्याठिकाणी असून जे नियमबाह्य असल्याचेही फाउंडेशनने म्हटले आहे. तसेच, सदर खाणीने ‘एमसीआर’ नियमांचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे या भागातील सेझा गोवा कंपनीच्या पाचही धोकादायक खाणीवरील काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मुळगावात झालेल्या या अपघातामुळे खनिजयुक्त पाणी गावात तसेच, शेतीत शिरल्याने गावातील पाण्याचे स्रोतही नष्ट झाले आहेत. तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना या खाणीने गेल्या दोन वर्षात किती खनिजाचे उत्खनन केले आहे, याचाही तपास सरकारने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments: