Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 July, 2011

‘‘अटालाच्या पलायनात गुन्हा विभागाचाच हात’’

साळगावकर आणि वस्त
यांना ताब्यात घ्या : पर्रीकर

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पोलिस, राजकारणी आणि ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटाला याला पळून जाण्यासाठी गुन्हा विभागानेच मदत केली. या प्रकरणाचा छडा लावायचाच असेल तर, ‘सीबीआय’ने गुन्हा विभागाचे अधीक्षक चंद्रकांत साळगावकर व निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांना ताब्यात घेऊन त्यांची जबानी नोंदवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. यासंबंधी ‘सीबीआय’ला पत्र पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना पर्रीकर यांनी गुन्हा विभागावर गंभीर आरोप केले. लकी फार्महाऊस हिने नव्याने दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक याचे ड्रग्ज व्यवहारात सरळसरळ नाव घेतले आहे. तो ‘रॉय’ आपला पुत्र नव्हेच, असा दावा करणारे गृहमंत्री त्यामुळे साफ उघडे पडले आहेत, अशी टीका पर्रीकर यांनी केली. अटाला याला जामीन देणारा प्रकाश मेत्री हा इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा सामान्य इसम आहे. गुन्हा विभागात अनेक प्रकरणांत नियमित साक्षीदार म्हणूनही त्याची नोंद आहे. अटाला याचे मेत्री याच्याशी संबंध असल्याचे ऐकिवात नाही व त्यामुळे गुन्हा विभागाच्या अधिकार्‍यांनीच मेत्री याला अटालाच्या जामिनासाठी तयार केले हे उघड आहे. साधे मिठाईचे दुकान चालवणार्‍या मेत्रीला अटालाच्या जामिनासाठीचे एक लाख रोख रुपये कुणी पुरवले, याचा शोध लावा, असे आवाहनही पर्रीकर यांनी केले. मेत्री याच्याशी संगनमत करून गुन्हा विभागानेच अटालाची सुटका केली व त्याला पळून जाण्यास मदत केली, असेच या घटनाक्रमावरून दिसून येते. ‘सीबीआय’कडून गुन्हा विभागातील अधिकार्‍यांची कसून चौकशी झाल्यास या प्रकरणामागील सत्य उजेडात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे सोडून हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न गुन्हा विभागाने केला व त्यामुळे सत्य उजेडात येण्यासाठी ‘सीबीआय’ला गुन्हा विभागाचीच कसून चौकशी करावी लागेल. रॉय नाईक हे गृहमंत्र्यांचे साहाय्यक म्हणून सेवेत आहेत व त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत हस्तक्षेप करून वरिष्ठ अधिकार्‍यांवर दबाव टाकला जाण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आपल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याचे अजिबात धाडस नाही व त्यामुळे रवी नाईक यांना डच्चू देण्याची मागणी करणे निरर्थक आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे ‘सीबीआय’ने आपल्या हातात घेतल्याने सत्य उजेडात आल्यानंतरच संबंधितांवर कारवाई होणार हे निश्‍चित, असेही पर्रीकर पुढे म्हणाले.
गुन्हा विभागात बदल्या का नाहीत?
पोलिस महासंचालकांना विश्‍वासात न घेता सरकारने थेट अधीक्षकांच्या बदल्या केल्या. परंतु, या बदल्यांतून गुन्हा विभागाला मात्र वगळण्यात आले आहे. गुन्हा विभागातील अधिकार्‍यांवर अलीकडच्या काळात अनेक गंभीर आरोप झाले आहेत. पण तरीही कारवाईचे सोडूनच द्या, पण या अधिकार्‍यांची साधी बदली करण्यासही गृह खाते तयार नाही. गुन्हा विभागाबाबत गृह खात्याला एवढा कळवळा का, असा खोचक सवालही पर्रीकर यांनी यावेळी केला. पोलिस महासंचालकांना अंधारात ठेवून बदल्या करण्यात आल्याने पोलिस महासंचालकांचा पोलिसांवरील ताबा सरकारला मान्य नाही व आपल्या मर्जीनुसारच पोलिसांनी वागावे, असेच त्यांना वाटत असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले.

No comments: