Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 July, 2011

पालकमंत्रीच चालवतात सांग्यात खाण!

आमदार वासुदेव मेंग गांवकर यांचा
ज्योकीम आलेमाव यांच्यावर तोफगोळा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): सांगे तालुक्याचे पालकमंत्री म्हणून मिरवणारे नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांना या तालुक्याशी काहीही देणेघेणे नाही. पालकमंत्र्यांचीच खाण सांग्यात चालू आहे व त्यामुळे ते येथील जनतेच्या अडचणी व समस्या सोडवणारच नाहीत, असा घणाघाती टोला आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी हाणला.
सांगे तालुक्याचा पालकमंत्री या नात्याने आपला मुलगा युरी आलेमाव याला विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा घाट हा ज्योकीम आलेमाव यांच्या राजकीय स्वार्थीपणाचा कळस आहे. त्यांना सांगेवासीय निवडणुकीत त्यांची खरी जागा दाखवून देतीलच, असेही ते म्हणाले. नगरविकासमंत्री असलेल्या ज्योकीम यांनी सांगेसाठी कोणते योगदान दिले, असा सवालही त्यांनी केला. फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १९ डिसेंबर रोजी झेंडावंदनापुरतेच त्यांचे या तालुक्याप्रति पालकत्व मर्यादित आहे काय, असा सवालही आमदार श्री. गावकर यांनी केला. रिवण, कावरे, तिळामळ भागांत खाण उद्योगामुळे स्थानिकांची काय हलाखीची परिस्थिती बनली आहे, याची कधी विचारपूसदेखील त्यांनी केली आहे काय? जे स्वतः खाण उद्योग करतात ते खाणग्रस्त लोकांची कोणत्या तोंडाने चौकशी करणार, अशी मल्लिनाथीही श्री. गावकर यांनी केली.
सांगेत नव्या पालिका इमारतीसाठी आलेमाव यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा करून काहीही झालेले नाही. पालिकेकडे निधी नसल्यानेच सांगे पालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे आपण स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तगादा लावून करून घेतली. पालिकेतील नगरसेवकांनाही त्यांची माहिती आहे. सांगेचे इस्पितळ अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्वतः याची पाहणी केली. या इस्पितळासाठी पालकमंत्री म्हणून ज्योकीम आलेमाव यांनी काय केले, असा प्रश्‍नही त्यांनी केला. फक्त निवडणूक काळात सांगेतील अतिदुर्गम भागांत जाऊन तेथील लोकांना भेटून प्रसिद्धी मिळवण्यातच सरकारला धन्यता वाटते. एरवी या लोकांचे सरकारला काहीही पडून गेलेले नाही. राज्याचा सर्वांत मोठा तालुका असलेल्या सांगे मतदारसंघाकडे कॉंग्रेसच्या राजवटीत पूर्णतः दुर्लक्ष झाले. निदान गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या तालुक्याला भरीव आर्थिक मदत मिळेल, अशी आशा होती परंतु ती देखील पूर्ण करण्याची या सरकारला ऐपत नाही, अशी टीका त्यांनी केली. सांगे तालुक्यात रवींद्र भवनाची मागणी करून आपण थकलो. सांगे येथील बॉटनिकल गार्डनजवळील जागा यासाठी निश्‍चित झाली होती परंतु कुणीतरी मुख्यमंत्र्यांचे कान फुंकले व ही जागा त्यांनी रद्द केली. प्रत्येक वेळी विधानसभेत रवींद्र भवनाचे आश्‍वासन पूर्ण करू, असे सांगितले जाते पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही, अशी खंतही यावेळी आमदार श्री. गावकर यांनी व्यक्त केली.
...तर सांगे तालुक्याचाच नाश
एका सांगे तालुक्यातच सुमारे ४० ते ४५ खाणी सुरू आहेत. या खाणींमुळे सांगे तालुक्यातील अनेक गावे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या खाणींना खनिज उत्खननाचा ज्या पद्धतीने परवाना मिळाला आहे तो पाहता भविष्यात हा तालुका पूर्णतः खाण उद्योजकांच्या घशात जाईल. परवाना मिळवलेल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी सांगेतील रस्त्यांचा वापर झाला तर इथे स्थानिकांना बाहेर पडणेही शक्य होणार नाही. सांगेतील जनतेने वेळीच हा धोका लक्षात घ्यायला हवा. येथील लोकांच्या गरिबीचा लाभ उठवून त्यांना आमिषे दाखवून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पुढे सरसावलेल्या या नेत्यांना वेळीच अद्दल घडवण्यातच सांगेवासीयांचे हित आहे, असेही आमदार श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.

No comments: