Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 July, 2011

वालंका जिंकली तर सामूहिक राजीनामे?

खवळलेल्या युवक कॉंग्रेस सदस्यांचा विचार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत राज्यातील मंत्री व आमदारांनी उघडपणे चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव हिचा प्रचार ‘सर्वशक्तीनिशी’ सुरू करून या निवडणुकीतील पारदर्शकतेचा बोजवारा उडवला आहे. साहजिकच वालंकाची अध्यक्षपदी निवडीची घोषणा झाल्यानंतर लगेच अनेक युवक सदस्यांनी संघटनेला रामराम ठोकण्याची तयारी आरंभल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सरकार पक्षातील नेत्यांनी जणू ‘हायजॅक’ केल्या आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीच बैठक घेऊन वालंकाच्या अध्यक्ष म्हणून उमेदवारीस पाठिंबा जाहीर केल्याने रिंगणातील अन्य उमेदवारांत संतापाची लाट पसरली आहे. उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष जितेश कामत यांनी या असंतोषाची माहिती राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचवण्याचे धाडस केल्याने संघटनेत त्यांचे कौतुक सुरू आहे.
दरम्यान, संघटनेच्या निवडणूक आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वालंका व कामत यांना नोटिसा पाठवून मतदान २६ व २७ जुलै रोजी ठेवले आहे. या नोटिसा म्हणजे केवळ उपचार असून वालंकाच्या निवडीला युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेतेही अनुकूल असल्याचे वृत्त फैलावले आहे.
चौदा उमेदवार रिंगणात
या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांत अदिल अहमद तिनवाले,गौरी सुभाष शिरोडकर,गौतम संतोष भगत, गोकुळदास महादेव सावंत, जितेश कामत, मुल्ला उरफान, नेहा ज्ञानेश्‍वर खोर्जुवेकर,प्रतिमा कुतीन्हो, सुमंगल लक्ष्मण गांवस, सुनील सुभाष नाईक,उबाल्डीनो डायस,वालंका आलेमाव व झेवियर अल्वीटो फिएल्हो यांचा समावेश आहे.
बाबू आजगावकरांचे ‘सासष्टीप्रेम’
पेडणे तालुक्यातून सुमंगल लक्ष्मण गावस या युवतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाही पेडण्याचे पालकमंत्री बाबू आजगावकर यांनी वालंकाला पाठिंबा देण्याचे आवाहन पेडणेतील युवक सदस्यांना केले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. बाबू यांनी पेडणे तालुक्यातील युवक कॉंग्रेस सदस्यांची बैठक येथील एका हॉटेलात बोलावून त्यांनी थेट वालंकाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. बाबू मूळ मडगावचे. ते धारगळ मतदारसंघातून निवडून येत असले तरी त्यांचे ‘सासष्टीप्रेम’ उफाळून आले आहे. पेडण्यातील युवक कॉंग्रेस सदस्यांना पाठिंबा देण्याचे सोडून वालंकाला पाठिंबा देण्याचे बाबू यांनी केलेले आवाहन या भागांतील अनेकांना रुचलेले नाही. बाबूंना वालंकाची एवढीच चिंता असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना सासष्टीची वाट दाखवावी लागेल, असा टोला या युवा नेत्यांनी हाणला आहे.
सामूहिक राजीनामे देणार
वालंका आलेमाव हिची निवड झाली तर अनेक युवक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा ठाम निर्धार केल्याची वदंता आहे. शिवाय या संघटनेवरही घराणेशाहीचा ठपका बसेल. त्यामुळे अन्य युवकांना संघटनेत सामील होण्याची विनंती करण्याचा कोणताच अधिकार आम्हाला राहणार नाही, अशी खंत एका युवक नेत्याने बोलून दाखवली.

No comments: