Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 July, 2011

संसदेत योग्य मसुदा न मांडल्यास उपोषण

अण्णा - सोनिया भेट
नवी दिल्ली, दि. २ : पंतप्रधानांनाही लोकपालाच्या कार्यकक्षेत आणावे या आणि आपल्या इतर मागण्यांसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. ‘सोनिया गांधी यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण आणि चांगली चर्चा झाली. जनलोकपाल विधेयकाच्या मसुद्याच्या माध्यमातून सिव्हिल सोसायटीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन सोनियांनी आम्हाला दिले आहे,’ असे अण्णा हजारे यांनी सोनियांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, सरकारने लोकपाल विधेयकाचा योग्य मसुदा संसदेत न मांडल्यास १६ ऑगस्टपासून जंतरमंतरवर उपोषण करण्याच्या आपल्या निर्णयावर आपण ठाम आहोत, असा इशारा अण्णांनी यावेळी दिला.
आम्ही आमची बाजू सोनिया गांधी यांच्यासमोर मांडली, असे अण्णा हजारे यांच्यासोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, अण्णा आणि सोनिया गांधी यांच्यात अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली आणि अण्णा हजारेंनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन सोनियांनी त्यांना दिले, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी या भेटीसंबंधी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
लोकपाल विधेयकाबाबत कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, असेही द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. सोनिया गांधी आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

No comments: