Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 July, 2011

सरकार सत्ताभ्रष्ट करा : वाघ

इंग्रजीकरणाविरोधात वाळपईत भाषाप्रेमींचा विशाल मोर्चा

वाळपई, दि. ३ (प्रतिनिधी)
विद्यमान कामत सरकारने प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान मान्य करून आपली संस्कृती मुळासकट नष्ट करण्याचे ठरविले आहे. गोव्याचा नागालँड करण्याचा घाट घातला जात आहे. ‘स्वत्व’ विकून टाकलेले नेते केवळ आपल्या स्वार्थासाठी इंग्रजीचा आग्रह करीत आहेत. ही कीड वेळीच ठेचली पाहिजे. येणार्‍या पिढीसमोर आपण कोणते भवितव्य ठेवणार आहोत याचा विचार करण्याची गरज येऊन ठेपली आहे. कारण हा प्रश्‍न केवळ भाषेचा नाही तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या अस्मितेचा, आपल्या परंपरांचा आहे. म्हणूनच जनतेने कामत सरकार सत्ताभ्रष्ट करावे असे आवाहन साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी केले.
सत्तरी भाषा सुरक्षा मंचतर्फे प्राथमिक स्तरावरील इंग्रजीकरणाविरोधात आज वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावेळी श्री. वाघ बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर, सत्तरी भाषा सुरक्षा मंच अध्यक्ष रणजीत राणे, समन्वयक ऍड. शिवाजी देसाई, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, मुख्याध्यापक कांता पाटणेकर, डॉ. प्रेमानंद दलाल तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांतील सत्तरीतील आजचा हा ऐतिहासिक मोर्चा आहे. मातृभाषेशी प्रतारणा जनता कदापि सहन करणार नाही हेच यावरून स्पष्ट होते. आजवर कोकणीच्या प्रेमात असणार्‍या आणि धड इंग्रजीसुद्धा न बोलता येणार्‍या चर्चिलना अचानक इंग्रजीचा पुळका कसा काय निर्माण झाला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भारतीय भाषांचे खच्चीकरण करण्याचा सरकारने जाणीवपूर्वक डाव रचला आहे. जनतेने आपल्या स्वाभिमानाला साद घालून मंत्री देत असलेल्या आमिषांना तसेच त्यांच्या दबावाला बळी न पडता जाहीरपणे या नेत्यांना जाब विचारायला हवा असे श्री. वाघ म्हणाले. माध्यमप्रश्‍नी आपल्या भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
प्रा. सुभाष वेलिंगकर
सरकारने प्राथमिक स्तरावर इंग्रजीला अनुदान देण्याचा निर्णय घेऊन गोमंतकीयांना मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अभद्र भेट दिली आहे. गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांचा सरकारने अपमान केला आहे. देशाचा स्वाभिमान पायदळी तुडवणार्‍या नतद्रष्ट्यांच्या दबावाला बळी पडून आपल्या संस्कृतीच्या नरडीचा घोट घेणारा निर्णय कॉंग्रेस सरकारने घेतला आहे, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले. मोर्चात भाषाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून आजही सत्तरीत दिपाजी राणेंच्या तेजाची परंपरा राखणारी जनता आहे हे दिसून आले व ही अभिमानाची गोष्ट आहे. एक महिला असूनही वीस वर्षांपूर्वी श्रीमती शशिकलाताई काकोडकर आपली भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी खंबीर राहिल्या होत्या. पण आज कामत सरकारने नामर्दपणा केला आहे. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
इंग्रजीकरणाला सत्तरी तालुक्यातूनही असलेल्या विरोधाची धार दाखवू देण्यासाठी सत्तरी भाषा सुरक्षा मंचने आयोजित केलेल्या या मोर्चाला वाळपई येथील सिटी हॉलकडून प्रारंभ झाला. सरकारविरोधात घोषणा देत पुढे सरकलेल्या या मोर्चाचे नगरपालिकेच्या रंगमंचावर जाहीर सभेत रूपांतर झाले. तालुक्यातील भाषाप्रेमी, विविध संघटनांचे पदाधिकारी, पालक तसेच विद्यार्थी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रणजीत राणे यांनी स्वागत केले तर ऍड. शिवाजी देसाई यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक कांता पाटणेकर यांनी केले. शेवटी सुरेश झरेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, मराठी संस्कार केंद्र (ब्रह्मकरमळी), ग्रामदर्शन प्रतिष्ठान (वाळपई), सिटीझन फोरम, भारतीय जनता पक्ष, संस्कृती संवर्धन समिती, श्री हनुमान विद्यालय माजी विद्यार्थी संघटना, ब्रह्मदेव सेवा समिती, सर्वोदय संस्था (वेळूस), जनसेवा प्रतिष्ठान (वाळपई), मराठी लेखक संघटना, प्रज्ञा प्रकाशन (वाळपई), मराठी साहित्य परिषद, सत्तरी जागृती युवा मंच आदी संस्थांनी मोर्चाला आपला पाठिंबा दिला.


क्षणचित्रे
* आजचा मोर्चा सत्तरीतील एक ऐतिहासिक मोर्चा.
* मोर्चात एक हजाराच्यावर भाषाप्रेमी सहभागी.
* महिलांचीही लक्षणीय उपस्थिती.
* मराठी अभंग व नाट्यगीते कालांतराने इंग्रजीत कशी म्हटली जातील हे विष्णू वाघांनी गाऊन दाखवल्यावर सभेत हास्याचे फवारे.
* ऍड. शिवाजी देसाईंच्या उर्दू शेरला टाळ्यांचा कडकडाट.

No comments: