Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 July, 2011

जिल्हा इस्पितळाबाबत सोमवारी म्हापशात धरणे

आरोग्यमंत्री खोटारडे : डिसोझा
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून तयार असलेले जिल्हा इस्पितळ आज, उद्या सुरू करणार असे तगादे लावत आणि न्यायालयाच्याही तोंडाला पाने पुसत असलेले आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे खोटारडेपणा करत असून खोटारडेपणाने वागतही आहेत असा आरोप म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास विलंब लावत असल्यामुळे सोमवार २५ जुलै रोजी भाजपतर्फे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धरणे धरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार डिसोझा यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, साळगावचे आमदार दिलीप परुळेकर, माजी आमदार सदानंद तानावडे, भाजप मंडळ अध्यक्ष राजसिंग राणे उपस्थित होते.
जुन्या आझिलोची अवस्था बिकट झाली आहे. मोडकळीस आलेल्या या इस्पितळात रुग्णांना आणि कर्मचार्‍यांना ठेवण्यात आलेले आहे. यावेळी जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री आरोग्य संचालिका की कॉंग्रेस पक्ष हे स्पष्टपणे सांगावे अशी ताकीदच डिसोझा यांनी यावेळी दिली. पेडे येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत असताना जुन्या आझिलोतील रुग्णांना गोमेकॉत हलविण्यात येत आहे. नवीन जिल्हा इस्पितळात सुविधा नाहीत. आझिलोतील रुग्णांना जर गोमेकॉत पाठवायचे असेल तर आझिलोतील सर्वच रुग्णांना बांबोळीला का नेण्यात येत नाही असा सवाल करत तसे केले असते तर सर्वांचीच काळजी मिटली असती असा टोला श्री. डिसोझा यांनी हाणला.
आझिलोबाबत रुग्णांच्या जीविताशी आरोग्यमंत्र्यांनी खेळ मांडलेला आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचा आपला हट्ट जर त्यांनी सोडला नाही तर जनताच त्यांना धडा शिकवेल असा इशारा श्री. डिसोझा यांनी दिला. बांधकाम खात्याने जुने आझिलो इस्पितळ खाली करण्याचा आदेश दिला होता. तेव्हाच इस्पितळ खाली करून पेडे येथे स्थलांतरित केले पाहिजे होते. पण खोटारड्या आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांना त्रास देण्यासाठीच त्यांना अद्याप जुन्या आझिलोत ठेवले आहे. असा आरोप श्री. डिसोझा यांनी केला.
यावेळी बोलताना श्री. मांद्रेकर म्हणाले की, खरेतर आरोग्यमंत्र्यांवर कुणाचाच विश्‍वास नाही. ते आज एक व उद्या वेगळेच बोलतात. जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचे आश्‍वासन त्यांनी विधानसभेत दिले होते. आजही ते इस्पितळ सुरू करण्याचे आश्‍वासन देतात आणि आपल्या फायद्यासाठी पीपीपी तत्त्वावर देण्यासाठी धावतात. मुख्यमंत्रीही आश्‍वासने देतात पण पाळत नाहीत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तयार झालेले इस्पितळ अद्याप सुरू होत नाही. याचा जाब येत्या निवडणुकीत आरोग्यमंत्र्यांना द्यावा लागेल असा इशारा श्री. मांद्रेकर यांनी दिला.
सोमवारी आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमात शिवोली, ताळगाव, थिवी, म्हापसा या मतदारसंघातील आमदार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. डिसोझा यांनी शेवटी केले.

No comments: