Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 July, 2011

‘मातृभाषा मनाची, तर इंग्रजी धनाची भाषा’

फादर दिब्रिटोंच्या रसाळ वाणीने ‘सुसंवाद घडो सदा’ रंगला
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मातृभाषा ही मनभावनांचे स्पंदन टिपणारी मनाची भाषा असून इंग्रजी ही धनाची भाषा आहे! मातृभाषा म्हणजे सचेतन मानवी देह असून इंग्रजी म्हणजे कधीही बदलता येणारे कपडे आहेत. यास्तव अन्य कितीही भाषा आत्मसात करा, मात्र मातृभाषेलाच सर्वोच्च प्राधान्य द्या. मातृभाषेला तुच्छ मानून पुढे गेलात तर समाजात अराजकता माजेल, असे इशारेवजा प्रतिपादन थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केले.
अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. तथापि, वाढता भ्रष्टाचार व जातीयता यामुळे २१व्या शतकात भारत आर्थिक महासत्ता होणे नाही; मात्र विविध धर्मांतील चांगुलपणामुळे हा देश आध्यात्मिक महासत्ता नक्कीच बनेल, असा दृढतर आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे स्व. भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पाटो पणजी येथील वास्तू संग्रहालयात ‘सुसंवाद घडो सदा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू उपस्थित होते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला फुले अर्पून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी दिब्रिटो यांनी आपल्या ओघवत्या भाषणात ‘धार्मिक व सामाजिक सलोखा’ या मुद्यावरविशेष भर दिला.
धर्म हा समाजाचे अंग आहे. धर्म मानवी मनातील उदात्त भावनांचा विकास घडविणारा घटक आहे. विविध धर्मांतील उच्च विचार एकत्र करून आपण परस्परांशी सुसंवाद साधायला हवा. त्याप्रमाणे समाजाने वागायला हवे. तसे झाल्यासच धार्मिक एकोपा राहील. काही सत्तालोलूप राज्यकर्ते स्वहितासाठी धर्माचा आधार घेऊन सामान्यांना वेठीला धरतात, असे ते म्हणाले.
खुद्द पोप यंानादेखील भारत ही अध्यात्मभूमी वाटते. येथील योगामुळे अनेक असंस्कृत विचार व विकार नाहीसे होतात. विज्ञानाच्या वाढीमुळे मानवाचा भौतिक विकास झाला; मात्र विज्ञान मनाला शांती देऊ शकत नाही, असे निरीक्षण देशविदेशांतील विविध भाषा व धर्मांचे गाढे अभ्यासक असलेले दिब्रिटो यांनी नोंदवले.
धार्मिक वृत्तीच्या मानवास शारीरिक व मानसिक आजार कमी होतात, असे विज्ञानानेच म्हटले आहे. त्यामुळे योग व ध्यान यांना नव्याने महत्त्व आले आहे. परंपरा आणि संस्कृती ही भारताची ओळखआहे. ती जपणे मातृभाषेद्वारेच शक्य आहे. राजकीय इच्छाशक्ती सर्व काही बदलू शकते. मात्र विद्यमान सत्ताधार्‍यांकडे तिचाच अभाव आहे. गोव्यात वसुंधरेला विविध पातळ्यांवर धोका निर्माण झाला असून तिच्या रक्षणार्थ सर्वांनी पुढे यावे असे आवाहन दिब्रिटो यांनी केले.
उपसंचालक अशोक परब यांनी स्वागत केले. परेश प्रभू यांनी ओळख करून दिली. अनघा देशपांडे यांनी सूत्रनिवेदन केले. ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------------------------
‘होय, नक्कीच प्रयत्न करेन’
गोव्यात माध्यमामुळे दोन समाजांत दरी निर्माण झाली असून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांनी त्यांना केली. त्यावर ‘हो अवश्य,’ असा अभिप्राय फादर दिब्रिटो यांनी दिला.

No comments: