Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 July, 2011

आम्ही पत्रावळीच उचलायच्या का?

दिलीप धारगळकर यांचा खडा सवाल
युवक कॉंग्रेस निवडणुकीचा वाद
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गोव्यात कॉंग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त इतरांच्या पत्रावळी उचलण्याचेच काम करायचे का? हा संतप्त सवाल केला आहे प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी नेते दिलीप धारगळकर यांनी. सामान्य कार्यकर्त्याची प्रामाणिक सेवा व कार्याची कॉंग्रेसला कदर नाही. युवक कॉंग्रेसच्या आत्तापर्यंतच्या कार्यात काडीचेही योगदान नसलेल्या चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालंका आलेमाव हिची प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री व इतर कॉंग्रेस नेत्यांनी उचललेला विडा हा सामान्य युवा कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास करणारा ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी ‘आम आदमी’लाही पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद प्राप्त करण्याची संधी मिळावी या हेतूने आखलेला निवडणूक कार्यक्रम वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निव्वळ फार्स ठरला आहे. प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारिणीसाठी २३ व २४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रदेश अध्यक्षपदासाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. चर्चिल कन्या वालंका हिने या पदावर दावा केला असून मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी उघडपणे वालंका हिचे समर्थन करून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे, असे श्री. धारगळकर म्हणाले. या सरकारकडून उत्तर गोव्यावर पूर्णतः अन्याय होतो आहे. उत्तर गोव्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते त्यांच्या खिजगणतीतही नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा खासदार, सेवा दल, महिला अध्यक्ष आदी सर्व पदे दक्षिणेतील नेत्यांकडेच आहेत. त्यामुळे यावेळी युवाध्यक्षपद तरी निदान उत्तर गोव्याला मिळेल, अशी आशा होती. परंतु, या पदावरही या नेत्यांनी दावा करून उत्तरेला वार्‍यावर सोडून दिले आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना खरोखरच वेगळा विचार करावा लागेल, अशी इशारेवजा धमकीही यावेळी श्री. धारगळकर यांनी दिली.
युवक कॉंग्रेसचे नेतृत्वच जबाबदार : पागी
युवक कॉंग्रेसचे अन्य एक सक्रिय नेते दयानंद पागी यांनी या परिस्थितीला युवक कॉंग्रेसचे नेतृत्वच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तळागाळातील युवकांपर्यंत पोचण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या नेतृत्वाने काहीच केले नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. वालंका आलेमाव हिचे नाव प्रदेश युवक अध्यक्षपदासाठी पुढे करण्याच्या प्रकाराबाबत बोलताना, ‘ही गोव्यातील कॉंग्रेसची पद्धतच’ आहे, अशी उपहासगर्भ प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘आम आदमी का सिपाही’ ही संकल्पना चांगली होती. परंतु, या योजनेलाही युवक कॉंग्रेसच्या नेतृत्वाने अजिबात साथ दिली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
केवळ चर्चिल आलेमाव यांची कन्या एवढीच काय ती वालंका आलेमाव हिची ओळख आहे. तिने आत्तापर्यंत युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रमांत कधीच भाग घेतला नाही. ती उच्चशिक्षित आहे हे जरी खरे असले तरी तिचा राजकीय अनुभव फक्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते व कंत्राटदारांनाच काय तो माहीत, असा टोला अन्य एका वजनदार युवक कॉंग्रेस नेत्याने नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर हाणला.
किरणकुमार रेड्डींच्या आरोपांत तथ्य
भारतीय युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस किरणकुमार रेड्डी चामला यांनी युवक कॉंग्रेसच्या निवडणुका या निव्वळ फार्स आहे व विविध नेते आपल्या बगलबच्च्यांचा उद्धार करीत असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. या आरोपामुळे संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, चामला यांचे आरोप गोव्याच्या बाबतीत सहीसही उतरत आहेत. भाषा माध्यमप्रश्‍नी चर्चिल आलेमाव यांच्या दबावासमोर लोटांगण घातलेले मुख्यमंत्री आता वालंका आलेमाव हिच्या निवडीसाठी प्रचार करताना पाहिल्यानंतर ते आलेमाव यांच्या हातातले बाहुले बनल्याचेच स्पष्ट होते, अशी खरमरीत प्रतिक्रियाही उमटली आहे.

No comments: