Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 July, 2011

युवक कॉंग्रेस निवडणुकीचा ‘फार्स’

सामान्य युवा कार्यकर्ते खिजगणतीतही नाहीत
अनेक पदाधिकारी संघटना सोडणार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या २३ जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी विविध नेत्यांनी आपापल्या बगलबच्चांची वर्णी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. युवक कॉंग्रेसची महत्त्वाची पदे सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांना देण्याचे गाजर सुरुवातीला दाखवण्यात आले खरे; परंतु वरिष्ठ पातळीवर मात्र ही संघटना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी युवक कॉंग्रेस सदस्यांवर दडपण आणण्याचे प्रयत्न चालवल्याने नाराज झालेल्या अनेक पदाधिकार्‍यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी युवक कॉंग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्याला संघटनेत महत्त्वाचे पद प्राप्त करता यावे यासाठीच निवडणुकीतून प्रदेश समितीची निवड करण्याची तथाकथित योजना आखली होती. या योजनेअंतर्गत विविध राज्यांत निवडणुका घेण्याचा कार्यक्रमही सुरू आहे. गोव्यातही ही प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसच्या सुमारे ३० ते ३५ नेत्यांचे एक पथक गोव्यात आले आहे. या निवडणुकीसाठी राज्यात मोठा गाजावाजा करून सदस्य नोंदणी मोहीमही राबवण्यात आली. परंतु, त्यात २० हजारांचा आकडा गाठणेही त्यांना कठीण गेले. बूथ सदस्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली असून त्यांच्याकरवी आता जिल्हा व राज्य कार्यकारिणीची निवड होणार आहे.
प्रदेश युवाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या १४ जणांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांची कन्या गौरी शिरोडकर, मडगावच्या नगरसेवक प्रतिमा कुतीन्हो तसेच उत्तर गोवा जिल्हा युवाध्यक्ष जितेश कामत यांचा समावेश आहे. चर्चिल आलेमाव यांनी वालंका आलेमाव हिच्या निवडीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ते वैयक्तिकरीत्या प्रत्येक सदस्याशी संपर्क साधत आहेत. सुभाष शिरोडकर यांच्याकडून आपल्या कन्येचे घोडे पुढे दामटले जात असून प्रतिमा कुतीन्हो यांची मदार विजय सरदेसाई यांच्यावर अवलंबून आहे. या बड्या राजकीय नेत्यांनी धडाक्यात सुरू केलेल्या प्रचार मोहिमेसमोर सामान्य युवक नेते मात्र कुठच्या कुठे भिरकावले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही वालंका आलेमाव हिच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवल्याने या नेत्यांत तीव्र असंतोष पसरला असून ही निवडणूक म्हणजे केवळ ‘फार्स’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही निवडणूक घेण्यासाठी केंद्रातून पाठवण्यात आलेल्या युवक नेत्यांची उठबस या बड्या नेत्यांकडूनच केली जात आहे व त्यामुळे युवक कॉंग्रेस संघटनांत महत्त्वाच्या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी प्रामाणिकपणे झटणारे स्थानिक युवक नेते मात्र पिछाडीवर पडले आहेत. युवक कॉंग्रेसचा सदस्य व युवाध्यक्षपदासाठी ३५ वर्षांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, या पदासाठी उमेदवारी शुल्क ७५०० रुपये ठेवण्यात आला आहे. एखाद्या महाविद्यालयीन युवकाला हा शुल्क अजिबात परवडणारा नसल्याने अनेकांची इच्छा असूनही त्यांना अर्ज दाखल करणे शक्य झालेले नाही. विविध बड्या नेत्यांनी सुरुवातीला आपल्या खर्चाने सदस्यांची नेमणूक केली व आता याच सदस्यांवर दबाव टाकून आपल्या बगलबच्चांना निवडून आणण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
येत्या २३ जुलै रोजी होणारी निवडणूक तीन पातळ्यांवर होणार आहे. त्यात गट समिती, जिल्हा समिती व प्रदेश समितीचा समावेश आहे. सुमारे १२०० सदस्यांना मतदानाचा हक्क राहणार आहे. मुळातच ही प्रक्रियाच अत्यंत किचकट असल्याचा व त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या प्रक्रियेची कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही काही युवक नेत्यांनी केला. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक विद्यमान युवक पदाधिकार्‍यांनी बंडांची निशाणी फडकवून संघटनेतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची खबर आहे.

No comments: