Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 June, 2011

मुख्यमंत्र्यांकडून अक्षम्य चूक : पर्रीकर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): ‘रावण हाही प्रखर शिवभक्तच होता. मात्र, त्याच्या दुष्कृत्यांमुळे तो राक्षस म्हणून ओळखला गेला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही गोमंतकीयांवर इंग्रजी लादून राक्षसी कृत्यच केले आहे व त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील’, अशी प्रखर टीका आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आझाद मैदानावरील धरणे कार्यक्रमात बोलताना केली. मुख्यमंत्री कामत यांचे अन्य सर्व अपराध माफ करता येतील, पण त्यांची ही चूक अक्षम्य आहे, असेही ते म्हणाले. सख्या आईला न ओळखणार्‍या लोकांना येत्या निवडणुकीत लोकांनी अद्दल घडवावी, असे आवाहनही श्री. पर्रीकर यांनी यावेळी केले.
प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाविरुद्ध आज भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांनी आणि पालकांनी सकाळी ९ ते ५ या दरम्यान आझाद मैदानावर धरणे धरले. त्याला विविध संघटनांनी तसेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या राजकीय पक्षांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.
फुटीरतावादाला आमंत्रण
नागालँडमध्ये शिक्षणाचे इंग्रजी माध्यम असल्याने त्या ठिकाणी फुटीरतावादी चळवळी वाढलेल्या आहेत. कारण सुरुवातीपासूनच इंग्रजी शिकलेल्यांना भारतापेक्षा युरोप जवळचा वाटतो. गोवा आणि नागालँडमधील परिस्थिती वेगळी असली तरी हे एका अर्थाने फुटीरतावादाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे पर्रीकर म्हणाले. चर्चमध्ये येणार्‍या वृद्ध व्यक्तीला समजावे म्हणून कोकणीतून प्रार्थना केली जाते. याच न्यायाने लहान मुलांना समजावे म्हणून मातृभाषेतूनच त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे, असा दाखला त्यांनी दिला. शिक्षणात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करता येत नाही. शिक्षणात केवळ हुशार आणि कमी हुशार अशीच विभागणी होते. कमी हुशार मुलाला इंग्रजीतून शिकवल्यास त्याचा ‘‘चर्चिल’’च होणार असा टोलाही त्यांनी हाणला.
आधीच ठरल्याप्रमाणे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याही मतदारसंघात धरणे धरले जाणार आहे, असे यावेळी शशिकला काकोडकर यांनी जाहीर केले. आपले भारतीय भाषांना समर्थन असल्याने आपल्या मतदारसंघात धरणे धरू नका, अशी मागणी श्री. ढवळीकर यांनी केली होती. सरकारचा इंग्रजीकरणाचा डाव हाणून पाडला जाईल. त्यासाठी पालकांमध्ये जागृती केली जाणार आहे. अजूनही अनेक पालकांमध्ये गैरसमज आहेत. या धरणे कार्यक्रमातून ते दूर केले जातील, असे त्या म्हणाल्या.
राज्यात धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करणार्‍या भस्मासुरांना संपवणारे हे आंदोलन आहे आणि या भस्मासुरांचा अंत केल्याशिवाय ते शमणार नाही, अशी गर्जना यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली. स्वातंत्र्यसैनिकांना शिव्या घालणारे पोर्तुगीज जहाजाचे मात्र स्वागत करतात. हेच लोक या इंग्रजीकरणाच्या कटामागे आहेत व त्यांना एका धर्मसंस्थेचे पाठबळ आहे, असा आरोप यावेळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केला. रवी नाईक, बाबू आजगावकर, सुदिन ढवळीकर आणि विश्‍वजित राणे लोकांना मूर्ख बनवत आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी केले. भाषा नष्ट झाली की संस्कृती नष्ट होते. उद्या आम्हाला गोवा हा वेगळा देश हवा, अशी मागणी करण्यास हे इंग्रजीवाले मागे पुढे पाहणार नाहीत, अशी भीती यावेळी प्रा. दत्ता भी. नाईक व प्रा. विनय बापट यांनी व्यक्त केली. राजदीप नाईक यांनी उद्या कला अकादमीतील मुख्यमंत्र्यांचा कसा होतो तेच आम्ही पाहणार असल्याचा इशारा दिला.विलास सतरकर यांनी सूत्रसंचालन केले.

No comments: