Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 June, 2011

बाबा रामदेव यांचे उपोषण चिरडले

आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराचा वापर
नवी दिल्ली, दि. ५
काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी अध्यादेश जारी करावा ही बाबा रामदेव यांची मागणी सरकारने ङ्गेटाळल्यानंतर बाबा रामदेव यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केल्यामुळे आता चर्चेस काही अर्थ नाही असे सरकारच्या लक्षात आले आणि मध्यरात्रीनंतर पोलिसांनी रामदेव आणि असंख्य आंदोलक रामलीला मैदानावर झोपले असताना कारवाई करून त्यांचे आंदोलन चिरडून टाकले. पोलिस कारवाईत अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मध्यरात्रीनंतर अचानक हजारो पोलिस आणि जलद कृती दलाचे जवान रामलीला मैदानात दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी रामदेव यांना मैदानाची देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आणि रामलीला मैदानातून बाहेर चलण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या हाती लागण्याऐवजी बाबा रामदेव यांनी आपल्या समर्थकांच्या गराड्यात उडी घेतल्यानंतर उपोषण मंडपात एकच गोंधळ उडाला. बाबा रामदेव यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना गराड्यातून बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न केले. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या ङ्गोडल्या आणि संतप्त आंदोलकांना लाठ्यांनी यथेच्छ बदडले.
यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वस्तूंची जोरदार ङ्गेकाङ्गेक केली. बाबा रामदेव यांना बसण्यासाठी तयार केलेल्या मंचालाही पोलिसांनीच आग लावल्याचे वृत्त त्याठिकाणी रात्री उपस्थित असलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी दिले आहे. रामदेव यांचे निकटचे सहकारी तिजारावाला यांनी तर, पोलिसांनी आपले अपहरण केले असून, आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले होते आणि बाबा रामदेव व त्यांच्या सहकार्‍यांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारताच्या सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या ङ्गोडताच आंदोलकांची धावपळ झाली. यावेळी अनेक जणांना आपल्या वस्तू मंडपातच सोडून पळ काढावा लागला. सकाळी रामलीला मैदानावर चपला, बूट आणि इतर वस्तूंचा खच जमा झाला होता.
या पोलिस कारवाईत सुमारे ३० जण जखमी झाल्याच्या वृत्ताला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाचे डॉ. लोकेश यांनी दुजोरा दिला. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर जखमा झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांना एम्स आणि राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेमके किती लोकांना दाखल करण्यात आले याची आकडेवारी मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.

चौकट....
महिला पोशाखात बाबा रामदेव
पोलिस आपल्याला हुसकावून लावण्यासाठी आल्याचे लक्षात येताच बाबा रामदेव यांनी समर्थकांमध्ये उडी घेतली. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना एक तास अथक परिश्रम करावे लागले. खाली उतरताच बाबा रामदेव आपल्या महिला समर्थकांच्या गराड्यात गेले. पोलिसांनी आपल्याला ओळखू नये यासाठी त्यांनी एका भगिनीचा पंजाबी ड्रेस परिधान केला आणि डोक्यावर दुपट्टादेखील घेतला होता. डेहराडूनला दुपारी घेतलेली पत्रकारपरिषद पूर्ण होईपर्यंत बाबा रामदेव याच पोशाखात वावरत होते.

रामलीला मैदानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने
नवी दिल्ली, दि. ५
बाबा रामदेव आणि त्यांच्या समर्थकांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वरिष्ठ नेते विजयकुमार मल्होत्रा यांच्या नेतृत्वात असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी आज रामलीला मैदानाबाहेर जोरदार निदर्शने केली.
विजयकुमार मल्होत्रा, भाजपाचे नऊ आमदार आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज सकाळी रामलीला मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना आत प्रवेश करण्यास मनाई केली. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. सरकारने आणिबाणीच्या आठवणींनाही लाजवेल असे कृत्य केले आहे, असा आरोप मल्होत्रा यांनी यावेळी केला.

No comments: