Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 June, 2011

कोकण रेल्वे पूर्ववत सुरू

मुंबई, दि. १९
संरक्षक भिंत रूळावर कोसळल्याने गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक अखेर रविवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे. काल रात्री मुंबईहून निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास रत्नागिरी स्थानकातून गोव्याच्या दिशेने धीम्या गतीने रवाना करण्यात आली. त्यामुळे कोकणी नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
रत्नागिरीजवळील पोमेंडी येथे मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत रुळावर कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. परंतु कोकण रेल्वेच्या अभियंत्यांनी व कामगारांनी गेले दोन दिवस अविश्रांत मेहनत घेत, रुळांवरील ढिगारे हलवण्याचे काम तडीला नेले. रत्नागिरीत काही दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या पावसाने विश्रांती घेतल्याने बंद पडलेल्या पोमेंडी रुळांवरील अडसर पूर्णपणे बाजूला करण्यात शनिवारी यश आले. वाकलेले व नादुरुस्त रूळ काढून नवीन रूळ टाकण्यात आला. २१ पोकलेन मशिन आणि २५० कामगारांच्या मदतीने दरडीचा प्रचंड ढिगारा उचलून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रेल्वे रुळांची चाचणी घेण्यात आली.
पावसाने उघडीप दिल्याने शनिवारी रात्री मुंबईहून सुटलेली ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’ आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकातून गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. अत्यंत धीम्या गतीने ही रेल्वे चालवण्यात आली असून, पोमेंडी ते निवसर मार्गात विशेष काळजी घेण्यात येणार आहे. ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’च्या निमित्ताने कोकण रेल्वे पुन्हा सुरू झाल्याने कोकण व गोव्यातील नागरिकांच्या जीवात जीव आला आहे.
दरम्यान, आठवड्यातून तीनवेळा चालणारी मुंबई-मंगलोर एक्सप्रेस, दररोजची मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस आणि दिवा-सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या येत्या २० तारखेपर्यंत रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे.

No comments: