Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 June, 2011

अण्णा हजारे यांचे आठ जूनला उपोषण

नवी दिल्ली, दि. ५
रामलीला मैदानात झोपलेल्या बाबा रामदेव आणि त्यांच्या समर्थकांना मध्यरात्रीनंतर पोलिस कारवाई करून हुसकावून लावल्याच्या निषेधार्थ येत्या आठ जूनला जंतरमंतर येथे एक दिवसाचे उपोषण करणार असल्याची घोषणा लोकपाल विधेयकासाठी लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज केली आहे.
यापासूनही केंद्रसरकारने धडा घेतला नाही तर व्यापक देशव्यापी आंदोलन उभारू, असा इशारा अण्णांनी आज येथे झालेल्या एका पत्रकारपरिषदेत बोलताना दिला आहे. या घटनेचा निषेध म्हणून जनलोकपाल विधेयकाच्या संयुक्त मसुदा समितीच्या उद्या होणार्‍या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जनप्रतिनिधींनी घेतला आहे, असेही अण्णांनी सांगितले. सरकारने बाबा रामदेव यांना दिलेला दगा लक्षात घेता मसुदा समितीच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणीदेखील अण्णांनी यावेळी केली.
देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच समूळ उच्चाटन करण्याच्या बाबतीत केंद्रसरकार उदासिन असून, असे करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी देशाला आणखी एका स्वातंत्र्य लढ्याची गरज आहे, असेही अण्णा यावेळी म्हणाले.
..........
सोनियांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
नवी दिल्ली, दि. ५
मध्यरात्रीनंतर पोलिस कारवाई करून बाबा रामदेव यांचे उपोषण चिरडल्यानंतर झालेल्या जोरदार टीकेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज आपले पुढील धोरण निश्‍चित करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय केला.
भाजपासहित जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रामलीला मैदानावर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध केल्यानंतर सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली होती, हे विशेष. या बैठकीला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री पी. चिदम्बरम्, संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी, सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, वीरेंद्र सिंग आणि जगदीश टायटलर हे नेते उपस्थित होते.

No comments: