Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 June, 2011

भाईड कोरगाव खाणप्रकरणी गीतेश नाईक अटकेत

देशप्रभूंना लवकरच अटकेची शक्यता
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): भाईड कोरगाव बेकायदा खाण उत्खनन प्रकरणी आज गुन्हा अन्वेषण विभागाने गीतेश नाईक याला अटक केली. पेडण्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी या खाणीचे बेकायदा उत्खनन करून राज्य सरकारचे करोडो रुपयांचे नुकसान केल्याचा दावा करून काशिनाथ शेटये व अन्य दोघांनी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा नोंद केला होता. उद्या सकाळी गीतेश नाईक याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेतली जाणार आहे.
या प्रकरणात गीतेश याला पहिलाच संशयित अटक झाली असून सदर खाण चालवणारे मुख्य सूत्रधार जितेंद्र देशप्रभू यांना लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहितीनुसार गीतेश नाईक याने या खाणीवरून खनिज वाहतूक करण्याचे कंत्राट घेतले होते. गीतेश याचे एका राजकीय व्यक्तीशीही संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गोष्टी पोलिस तपासात उघड होणार की नाहीत, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी सुमारे १ कोटी रुपयांचे खनिज उत्खनन याठिकाणी केल्याचा दावा करून जितेंद्र देशप्रभू यांनाखाण संचालनालयाचे संचालक अरविंद लोलयेकर यांनीनोटीस बजावली होती. तसेच, ही रक्कम सरकार दरबारी जमा करण्याचेही आदेश दिले होते.
अधिक माहितीनुसार अरविंद लोलयेकर यांनी या भाईड कोरगाव येथे बेकायदा खनिज उत्खनन होत असल्याची माहिती पेडणे पोलिसांना दिली होती. परंतु, पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी त्यावर कोणताही कारवाई केली नसल्याचेही गुन्हा अन्वेषण विभागाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे पेडणे पोलिसांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी आमदाराने बेकायदा खनिज उत्खनन करून सरकारला करोडो रुपयांचा चुना लावल्याने काशिनाथ शेटये यांनी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारीची कोणताही दखल पोलिसांनी घेतली नसल्याने पेडणे प्रथम वर्ग न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर श्री. देशप्रभू यांच्या विरुद्ध गुन्हा अन्वेषण विभागाला संशयितावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

No comments: