Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 June, 2011

बाळ्ळी जळीतकांडप्रकरणी दीपक फळदेसाईला अटक

• न्यायालयात आज हजर करणार
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): बाळ्ळी जळीतकांड प्रकरणाचा मुख्य संशयित दीपक फळदेसाई आज गुन्हा अन्वेषण विभागाला शरण आला. त्यामुळे मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या दोन्ही तरुणांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी संशयित दीपक फळदेसाई याचा दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पोलिसांनी दीपक याला खून, जाळपोळ करणे आणि बेकायदा जमाव गोळा करणे या गुन्ह्याखाली अटक केली असून उद्या सकाळी त्याला पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीपक याच्यासह अन्य पंधरा जणांवर हा गुन्हा नोंद केला होता. त्याचप्रमाणे, याच प्रकरणातील अजून दोन संशयित नरेंद्र फळदेसाई आणि प्रशांत फळदेसाई यांना चौकशीसाठी उद्या गुन्हा अन्वेषण विभागात हजर राहण्यास सांगितले आहे. नरेंद्र हा आमदार रमेश तवडकर यांच्यावर हल्ला करण्यास तर, प्रशांत हा जाळपोळ करणार्‍या गटाचे नेतृत्व करीत असल्याची माहिती चौकशीत उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्य संशयित दीपक हा पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता महत्त्वाची माहिती बाहेर येणार आहे. ‘उटा’ आंदोलन संपल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी या टोळीला कोणी व कशासाठी त्याठिकाणी पाठवले होते? आंचल इमारत आणि आदर्श सोसायटीला कोणाच्या आदेशावरून आग लावण्यात आली? तसेच मंगेश याला कोणी जिवंत जाळले? या सर्वच प्रश्‍नांची माहिती उघड होणार आहे. त्याचप्रमाणे, हे जळीतकांड करण्यासाठी ज्यांचा समावेश होता, त्यांनाही अटक होण्याची शक्यता नाकारली जात नाही.
आमदार रमेश तवडकर यांच्यावर हल्ला करण्यात, आंचल व आदर्श इमारतींना आगीच्या हवाली करण्यास दीपक याचा पुढाकार असल्याचे पोलिसांच्या हाती आलेल्या छायाचित्रीकरणावरुन व छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. तसेच, मंगेश गावकर जळत असता दुसर्‍या मजल्यावर अडकलेला सोयरु वेळीप यांनी, आपण बाहेर काही लोक इमारतीला आग लावत असल्याचे पाहिले होते, अशी जबानी दिली आहे. त्या जबानीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून त्यांनी ओळखलेल्या अन्य संशयितांनाही पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या या प्रकरणाचे अनेक पुरावे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मंगेश याला आगीत टाकण्यापूर्वी त्याच्यावर कोणी हल्ला केला. तसेच, दिलीप याला रक्तबंबाळ करून शौचालयात डांबून कोणी ठेवले, याचा शोध लागणे अद्याप बाकी आहे. या विषयीचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाच्या महिला निरीक्षक सुनिता सावंत करीत आहेत.

No comments: