Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 June, 2011

‘कामत कॉम्प्रोमाईज मुख्यमंत्री’

भाजपतर्फे सांग्यात ‘धिक्कार दिन’
सांगे, दि. ८ (प्रतिनिधी): दिगंबर कामत हे ‘कॉम्प्रोमाईज’ मुख्यमंत्री असून त्यांच्यात मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्याची क्षमता नाही असे प्रतिपादन आज सांगे येथे सुप्रज नाईक तारी यांनी केले.दिगंबर कामत सरकारच्या चार वर्षांच्या भ्रष्ट राजवटीच्या निषेधार्थ गोवा भाजपतर्फे आयोजित केलेल्या निषेध सभांना आजपासून सुरुवात झाली. सांगे येथे आज सांगे भाजप युवा मोर्चातर्फे निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी श्री. तारी बोलत होते.
सांग्याचे नगराध्यक्ष संजय रायकर यांनी पालिका क्षेत्रात कोठेही मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळू देणार नाही असा काल इशारा दिला होता. मात्र यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमाकात्मक पुतळ्याचे दहन पालिकेसमोरच करत आपला क्षोभ व्यक्त केला. यावेळी आमदार वासुदेव मेंग गावकर, रिवण जिल्हा पंचायत सदस्य नवनाथ नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष सुप्रज नाईक तारी, सांगे मंडळ अध्यक्ष आनंद नाईक, दक्षिण गोवा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष भावेश जांबावलीकर, पंच सदस्य राजेश गावकर, प्रभाकर नाईक, सुभाष वेळीप, मेघ देईकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
कामत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याने कामत सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. उटाला मिळालेले हिंसक वळण हे सरकारच्या हुकूमशाहीमुळेच झाले असून या जळीतकांडाला पूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. मातृभाषेवर अन्याय करत इंग्रजीला अनुदान देण्याचा अन्यायकारी निर्णय कामत सरकारने बदलावा अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील असा इशाराही यावेळी आमदार गावकर यांनी दिला.
पुढे बोलताना श्री. तारी यांनी सरकारवर खडसून टीका केली. विकासात अपयशी ठरलेले कामत सरकार बेकायदा खाणींना पाठिंबा देत आहे, आंदोलकांवर अत्याचार करते, मातृभाषेवर अन्याय करते म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे आज दहन करण्यात आल्याचे श्री. तारी यांनी सांगितले.
दरम्यान, सांगे बसस्थानकावर आरोग्यखात्याचे डेंग्यू विषयी अभियान सुरू असल्याने कार्यक्रमाची वेळ व स्थान बदलण्यात आले असून युवा मोर्चा कोणाच्या इशार्‍याला घाबरत नसल्याचे श्री. तारी यांनी ठणकावून सांगितले.

No comments: