Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 June, 2011

रत्नागिरीजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प!

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): कोकणात काल रात्री पडलेल्या धुवाधार पावसाने निवसार - रत्नागिरी येथे साधारण ६० मीटर लांबीची दरड रेल्वे मार्गावर कोसळली. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. दरड बाजूस करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत ती हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल, असा अंदाज आहे.
या पावसाळ्यात कोकण रेल्वेला बसलेला हा पहिलाच हादरा आहे. या संकटामुळे या मार्गावरून गोव्यात येणार्‍या सर्व गाड्या रत्नागिरी स्थानकावर रोखून धरल्या गेल्या आहेत. तेथून प्रवाशांना बसने रवाना केले गेले; तसेच गोव्यातील विविध भागांत अडकलेल्या प्रवाशांना रेल्वे अधिकार्‍यांनी बसमधूनच रत्नागिरीपर्यंत पाठविले.
या घटनेनंतर आज मडगावहून सुटणार्‍या दिवा, मांडवी एक्सप्रेस या गाड्या रद्द केल्या गेल्या तर, एर्नाकुलमहून येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या मडगाव व बाळ्ळी येथे थांबवून ठेवल्या आहेत. तसेच गुजरात, दिल्ली, ओखा येथून एर्नाकुलमपर्यंत जाणार्‍या गाड्या रत्नागिरीला रोखून धरल्या गेल्या आहेत. राजधानी एक्सप्रेस, एर्नाकुलम -दिल्ली एक्सप्रेस व इतर काही लांब पल्ल्याच्या गाड्या लोंढामार्गे वळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोकण रेल्वेचे जनसंपर्क महाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्याचे वृत्त येताच लगेच मदतकार्य सुरू करण्यात आले असून अवजड यंत्रसामग्री कार्यरत करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल व त्यानंतरच मार्गाची चाचणी घेऊन वाहतूक सुरू केली जाईल. रत्नागिरी स्थानकापासून काही अंतरावर गोव्याच्या बाजूने ही दरड कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मडगाव स्थानकावरून सुटणार्‍या गाड्या अडून राहिल्याने शेकडो प्रवाशांना स्टेशनवरील फलाटावरच थांबावे लागले तर कित्येक प्रवाशांनी खास टॅक्सी करून वा बसने जाणे पसंत केले. मडगाव रेल्वे स्थानकावर पाणी भरल्याने प्रवाशांचे सामान पावसात भिजून गेले; तसेच प्रवाशांची निवार्‍यासाठी धावपळ उडाली.

No comments: