Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 June, 2011

कुड्डेगाळ खाणीवर शोधकार्य सुरूच

अजूनही दोघेजण बेपत्ता

शिगाव, दि.१९(प्रतिनिधी)
कुंड्डेगाळ-दाभाळ येथीलफोेमेंतो कंपनीचा ढिगारा कोसळून आज तीन दिवस झाले. काल शनिवारी सायंकाळी अजित नाईक या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधून काढण्यास यश आले. आज दिवसभर पोकलीनच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उपसणे चालू होते. मात्र आज उर्वरित दोन्ही मृतदेह शोधण्यात यश आले नाही. दि. १७ जून रोजी रात्री कुड्डेगाळ फोमेंतो खाणीवरील टेलिंग पॉइंटवरील मातीचा ढिगारा कोसळला होता. त्या ढिगार्‍याखाली एक अभियंता क्वाद्रुज तिपाजी, कामगार गुलप्पा चलमी तर तिसरा सुरक्षा रक्षक अजित नायक हे गाडले गेले आहेत. यातील सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. आज सकाळपासून सुरू असलेले शोधकार्य सायंकाळी ७ वाजता संपले. मात्र, ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या दोघांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. उद्या पुन्हा दिवसभर शोधकार्य चालूच ठेवणार असल्याची माहिती येथील अधिकार्‍यांनी दिली. पोकलेनच्या साहाय्याने कोसळलेल्या मातीचा ढिगारा उपसण्याचे कार्य आज दिवसभर चालू होते. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड संख्येने तेथे गर्दी केली होती.
दरम्यान, कामगार गुलप्पा चलमी यांचे कर्नाटकाहून आलेले कुटुंबीय अजूनही खाणीवर ठाण मांडून आहेत. त्यांची पत्नी व दोन मुले आक्रोश करत आहेत. शनिवारी मिळालेला सुरक्षा रक्षकाचा मृतदेह मडगावातील हॉस्पिसियोमध्ये ठेवण्यात आलेला आहे.
तळे खाणीची पुनरावृत्ती
दहा वर्षांपूर्वी उगे-तळे येथील तिंबलो कंपनीच्या खाणीत मातीचा ढिगारा कोसळून जी जीवित व वित्त हानी झाली होती, त्याच घटनेची पुनरावृत्ती या खाणीवर झाल्याचे दिसून येत आहे. फोमेंतो खाणीवरील संबंधित अधिकारी या ढिगार्‍याखाली केवळ तीन व्यक्ती गाडले गेल्याचे सांगत असले तरीही तो आकडा वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या या खाणीवर पोकलेन व अन्य सामग्रीच्या साहाय्याने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उद्या दिवसभराच्या शोधकार्यात संबंधित दोघांचा पत्ता लागेल असा विश्‍वास संबंधित अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

No comments: