Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 June, 2011

उमा भारती पुन्हा भाजपमध्ये

नवी दिल्ली,दि. ७ : तब्बल सहा वर्षांनंतर उमा भारती यांनी आज भाजपत प्रवेश केला. ‘भाजपच माझा किनारा आणि भाजपच माझी मंझील,’ असे उद्गार उमा भारती यांनी यावेळी काढले. पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
उमा भारती यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले की, उत्तर प्रदेश हेच उमा भारती यांचे कार्यक्षेत्र असेल आणि या राज्यातील निवडणूक प्रचारात त्यांना मुख्य भूमिका पार पाडायची आहे. त्यांना पक्षात सामावून घेण्याचा निर्णय मतैक्याने घेण्यात आला असून, त्यांच्या रूपाने उत्तर प्रदेशात भाजपला नवी शक्ती लाभलेली आहे. देशात कुठेही दौरा करण्यासाठी उमा भारती तयार असून, सध्या तर त्या केवळ उत्तर प्रदेशवरच आपले लक्ष केंद्रित करणार आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले
स्वगृही परतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उमा भारती म्हणाल्या की, ‘घरात परत आल्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी कुठेही राहिले, कुठेही गेले तरी भाजप हाच माझा किनारा आहे आणि भाजप हीच माझी अंतिम मंझील आहे. सहा वर्षे बाहेर राहून मला या सत्यतेची जाणीव झाली आहे. या सहा वर्षांत मी आणखी एक गोष्ट शिकले, ती म्हणजे, कुणाला राष्ट्रसेवा करायची असेल, विचारधारेशी जुळून राहायचे असेल आणि काही आदर्शांवर कायम राहायचे असेल तर या देशात भाजपशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मला माझ्या आयुष्यातील ते सहा वर्षांचे कटू क्षण विसरायचे आहेत,’ असेही उमा भारती यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेश हे राज्य ‘राम आणि रोटी’चे तसेच ‘मंडल आणि कमंडल’चे असल्याने या राज्यात मला राम मंदिरापासून रामराज्याची निर्मिती करायची आहे. हेच माझे अंतिम लक्ष्य आहे. मला पक्षाची सेवा करायची आहे आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या. पक्षात पुन्हा सामावून घेतल्याबद्दल त्यांनी पक्षाच्या सर्वच नेत्यांचे यावेळी आभार मानले. नंतर उमा भारती यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

No comments: